भाजपा आमदारांनो, तीर्थप्रसादाला या...!

By Admin | Updated: November 7, 2015 21:55 IST2015-11-07T21:52:47+5:302015-11-07T21:55:33+5:30

आमंत्रण प्रकरणी हल्लाबोल : गिरीश महाजन यांच्या पालकत्वावर महापालिका महासभेत शंका

BJP MLAs, pilgrimage center ...! | भाजपा आमदारांनो, तीर्थप्रसादाला या...!

भाजपा आमदारांनो, तीर्थप्रसादाला या...!

भाजपा आमदारांनो, तीर्थप्रसादाला या...!आमंत्रण प्रकरणी हल्लाबोल : गिरीश महाजन यांच्या पालकत्वावर महापालिका महासभेत शंकानाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडले जात असताना सर्वपक्षीय कृती समितीने छेडलेल्या आंदोलनाकडे पाठ फिरविणाऱ्या आणि आंदोलनासाठी आमंत्रण दिले नसल्याचा कांगावा करणाऱ्या भाजपाच्या स्थानिक पाचही आमदारांना महापालिकेच्या विशेष महासभेत सदस्यांनी लक्ष्य केले. पाणीप्रश्नी आंदोलन म्हणजे सत्यनारायणाची पूजा होती काय, म्हणून त्यांना तीर्थप्रसादाला निमंत्रित करायचे, अशा तिखट शब्दांत सदस्यांनी हल्लाबोल करतानाच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेबद्दलही शंका उपस्थित केल्या.
पाणीप्रश्नी महापौर अशोक मुर्तडक यांनी बोलाविलेल्या विशेष महासभेत सर्वाधिक लक्ष्य ठरले ते भाजपाचे पाचही आमदार आणि पालकमंत्री गिरीश महाजन. संतापाची छडी मग राज्य सरकारबरोबरच प्राधिकरण आणि उच्च न्यायालयावरही उगारली गेली. सर्वपक्षांनी मतभेद बाजूला ठेवत आंदोलनात सहभाग नोंदविला; परंतु भाजपाच्या आमदारांचे दूरध्वनी स्वीच आॅफ होते. पाणी आणि पत एकदा गेली की परत मिळत नाही. त्यामुळे भाजपा आमदारांनी पाठ फिरविल्याने त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पाचही आमदार महापालिकेचेही नगरसेवक आहेत. त्यांनी आंदोलनाच्या वेळी तोंड लपवत फिरण्यापेक्षा प्रत्यक्ष सहभागी होऊन जनतेच्या भावना सरकारदरबारी पोहोचविल्या असत्या तर धरणातील पाणीसाठा वाचवता आला असता, अशा भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. सदस्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही तोफ डागली. पालकमंत्री नाशिकचे आहेत की मराठवाड्याचे, असा सवाल करत सिंहस्थात फोटोसेशन करणारे पालकमंत्री गिरीश महाजन नाशिककरांवर संकट ओढवले असताना नेमके कुठे गायब झाले होते? केवळ राजकीय हेतूने पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याचा आरोपही सदस्यांनी केला. याचवेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी छगन भुजबळ यांच्या पालकत्वाचे स्मरण करून देत महाजन यांची खोड काढली. पाणीप्रश्नी आंदोलनात आमंत्रणावरून झालेल्या मानापमान नाट्याचाही सदस्यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या निवडणुकीत मनसेचे तीन आमदार ज्याप्रमाणे घरी गेले तशी वेळ भाजपा आमदारावरही येवू शकते असा टोलाही सदस्यांनी लगावला. अजय बोरस्ते यांनी सावजी, मोरुस्कर यांना निमंत्रित केल्याचे रेकॉर्ड असल्याचे सांगितले.
भाजपा सरकार, आमदार आणि पालकमंत्र्यांवर हल्ला चढविला जात असताना भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर, ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, प्रा. कुणाल वाघ यांनी बचावाची भूमिका घेत पाणीप्रश्नी भाजपा पूर्णपणे नाशिककरांसोबत असल्याची ग्वाही दिली. यावेळी ‘देर आए दुरुस्त आए’ म्हणत सदस्यांनी त्यांचे स्वागतही केले आणि मुख्यमंत्र्यांकडे ताकदीने भूमिका मांडण्याची विनंती केली. (प्रतिनिधी)

Web Title: BJP MLAs, pilgrimage center ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.