भाजपाचा महापौरपदाचा उमेदवार तीन दिवसांत
By Admin | Updated: March 1, 2017 00:26 IST2017-03-01T00:26:20+5:302017-03-01T00:26:34+5:30
नाशिक : शहराच्या महापौरपदासाठी भाजपाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या असून, येत्या तीन दिवसांत सुकाणू समितीच्या बैठकीत घोषित करण्यात येणार आहे.

भाजपाचा महापौरपदाचा उमेदवार तीन दिवसांत
नाशिक : शहराच्या महापौरपदासाठी भाजपाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या असून, येत्या तीन दिवसांत सुकाणू समितीच्या बैठकीत घोषित करण्यात येणार आहे. याशिवाय आता उपमहापौर आणि अन्य पदांसाठीदेखील भाजपात हालचाली सुरू झाल्या आहेत. अन्य पक्षांमध्ये नोंदणी आणि गटनेता पदासाठी धावपळ सुरू असून, शिवसेनेत मात्र विरोधी पक्षनेता पदासाठी चुरस आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्तेचा लोलक कोणाकडे जाणार याची चुरस यंदा नाही. तरीही नाशिकचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी असून, त्यात भाजपाकडे पाच उमेदवार आहेत. रंजना भानसी या ज्येष्ठ नगरसेवक असल्याने त्यांचा दावा असला तरी पक्षात अन्यही उमेदवार आहेत. यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत सुकाणू समितीची बैठक होईल आणि त्यात महापौर तसेच उपमहापौरपदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत भाजपाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांकडे विवाह सोहळे असून, ते पार पडल्यानंतरच महापौरपदाच्या निवडणुकीसाठी निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. भाजपाकडून उपमहापौर, सभागृह नेता आणि स्थायी समितीचे दावेदार अधिक असून, त्यामुळे आता त्यासाठीही व्यूहरचना होणार आहेत. शिवसेनेते विरोधी पक्षनेता पदासाठी चर्चा सुरू आहे. सध्याच्या पद्धतीप्रमाणे विरोधी पक्षनेता आणि गटनेता अशी दोन पदे राहिल्यास त्यानुसार दोन ज्येष्ठांना संधी मिळणार आहे. महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि सुधाकर बडगुजर यांच्या दावेदारीबरोबरच आता आपल्या प्रभागातच चारही शिवसेना उमेदवार निवडून आणलेल्या विलास शिंदे यांनीही दावेदारी केली आहे. (प्रतिनिधी)