कॉँग्रेस ताब्यात राखणार की भाजपा खेचणार
By Admin | Updated: January 14, 2017 00:31 IST2017-01-14T00:31:29+5:302017-01-14T00:31:45+5:30
पदवीधर मतदारसंघ : राजकीय समीकरणे बदलल्याने दुहेरी लढतीचे संकेत

कॉँग्रेस ताब्यात राखणार की भाजपा खेचणार
नाशिक : राज्यात कॉँग्रेसची सत्ता असतानाही पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व ठेवून असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून सात वर्षांपूर्वी कॉँग्रेसने हा मतदारसंघ खेचून आणला असला तरी, राज्यात व केंद्रात झालेल्या सत्तांतरानंतर होत असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस व भाजपा या दोनच पक्षांमध्ये पुन्हा लढत होण्याचे संकेत आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली असून, या निवडणुकीसाठी कॉँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे, भारतीय जनता पक्षाने डॉ. प्रशांत पाटील तर तिसऱ्या आघाडीने कॉ. राजू देसले यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघावर म्हणजेच २००९ पर्यंत भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व राहिले. ना. स. फरांदे यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले, त्यानंतर १९९८ मध्ये फरांदे यांच्याऐवजी भाजपाने प्रतापदादा सोनवणे यांना उमेदवारी दिली. सलग दोन वेळा सोनवणे या मतदारसंघातून निवडून आले, मात्र त्यांना २००९ मध्ये त्यांना खासदारकी लाभल्याने पदवीधर मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना झालेल्या या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली, त्यात भाजपाकडून प्रसाद हिरे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अॅड. नितीन ठाकरे रिंगणात होते. यांच्या लढतीत अपक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी विजय मिळवत अल्पकाळासाठी का होईना या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणले. त्यानंतर वर्षभरात म्हणजे २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत राजकीय गणिते बदलली. डॉ. सुधीर तांबे यांना दोन्ही कॉँग्रेसने उमेदवारी दिली व भाजपाने प्रा. सुहास फरांदे यांना रिंगणात उतरविले. सरळ सरळ दुरंगी झालेल्या या निवडणुकीत तांबे यांनी पुन्हा बाजी मारून मतदारसंघावर कब्जा मिळविला व भाजपाला दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व परिस्थितीला सहा वर्षांचा कालावधी लोटला असून, या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. केंद्रात व राज्यात सत्तांतर घडले, मतदारांवर मोदी नावाचे गारुड घट्ट बसले तर ताकदवान समजल्या जाणाऱ्या कॉँग्रेसची ताकद क्षीण झाली. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा या मतदारसंघातील अडीच लाख मतदार सामोरे जाऊ पहात असताना बदललेल्या राजकीय समीकरणांपासून ही निवडणूकही दूर राहू शकत नाही. कॉँग्रेस व राष्ट्रवादीत सत्ता काबीज करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ पाहता, राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत उतरण्याची कॉँग्रेसला मध्यंतरी धमकी दिली तशीच आजमावणी शिवसेनेनेही करून पाहिली. अर्थातच राष्ट्रवादी असो की शिवसेना या दोघांना ही निवडणूक लढविण्यापेक्षा मित्रपक्षांना जेरीस आणणे हाच एकमेव हेतू आहे हे लपून राहिलेले नाही. कारण दोन महिने या मतदारसंघासाठी मतदारांची नोंदणी सुरू असताना या दोन्ही पक्षांनी त्यासाठी दाखविलेली उदासीनता बरेच काही सांगून गेली. (प्रतिनिधी)