भाजपा सरकार उद्योगपतींच्या हिताचे
By Admin | Updated: July 30, 2015 00:12 IST2015-07-30T00:11:37+5:302015-07-30T00:12:14+5:30
विलास गरुड : बसपाच्या आरक्षण परिषदेत टीका

भाजपा सरकार उद्योगपतींच्या हिताचे
नाशिक : भाजपाचे सरकार हे केवळ उद्योगपतींच्या हिताचे असून मोदींनी जनतेला केवळ आश्वासने दाखवून भूलथापा दिल्या आहेत. ‘अच्छे दिन आएंंगे’ असा भावनिक आशावाद घराघरांपर्यंत पोहचविला आणि लोकांची दिशाभूल केली. जनतेचे अच्छे दिन येण्याऐवजी मोदींपासून तर वसुंधरा राजेंपर्यंत सर्वांचे अच्छे दिन आले आहे. मोदी टीम तुपाशी अन् जनता उपाशी अशी अवस्था सध्या झाली आहे, अशी जोरदार टीका बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केली.
महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये आयोजित जिल्हास्तरीय आरक्षण परिषदेप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या परिषदेत बोलताना गरुड यांनी कॉँग्रेस, भाजपा, रिपाइं आठवले गट अशा सर्वच पक्षांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित करून चौफेर टीका केली. घटनात्मक आरक्षणासाठी या महाराष्ट्रात संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे. राज्य घटनेत इतर मागासवर्गीयांसाठी आयोगाची स्थापना करून अनुसूचित जाती-जमातींप्रमाणेच त्यांना सोयीसवलती दिल्या जाव्यात अशी, तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली; मात्र मनुवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांकडून अद्याप त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप गरुड यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर अरुण काळे, मुकुंद गांगुर्डे, आनंद आढाव, मच्छिंद्र आहिरे, रमेश निकम, राहुल आहिरे, धर्मा जाधव, तुळशीराम खोटरे आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मायावती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच ‘भीमसंध्या’ हा भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)