भाजपा प्रवेश सोहळ्यावर ‘संक्रांत’

By Admin | Updated: December 25, 2015 23:43 IST2015-12-25T23:39:49+5:302015-12-25T23:43:05+5:30

दानवेंचा दौरा रद्द : मनसेला मिळाला दिलासा; नेत्यांच्या आकांक्षांना बसला ब्रेक

BJP admits 'Sankrant' | भाजपा प्रवेश सोहळ्यावर ‘संक्रांत’

भाजपा प्रवेश सोहळ्यावर ‘संक्रांत’

नाशिक : मनसे फोडून भाजपात प्रवेश करवून घेण्याच्या काही नेत्यांच्या आकांक्षांना ब्रेक बसला आहे. रविवारी येणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दौरा स्थगित झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, त्यामुळे मनसेच्या स्थानिक नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार वसंत गिते यांनी आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यानंतर मनसेच्या काही नगरसेवकांनी त्याचे अनुकरण केले असले तरी सध्या नगरसेवक पद असल्याने आणि काहींकडे पद असल्याने त्यांनी प्रवेश टाळला होता. २०१७ मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत मोठी फूट पडणार असल्याची चर्चा असून, या फुटीर नगरसेवक भाजपाच्या गळास सहज लागतील अशी अटकळ बांधली जात असताना अन्य सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनेदेखील तशी तयारी केली आहे. दुसरीकडे अनेक मोठे नेते पक्षातून गेल्याने मनसेच्या स्थानिक नेतृत्वावर डॅमेज कंट्रोलचे मोठे आव्हान उभे होते. त्यातून स्थानिक नेतृत्वाची कसोटी लागणार होती. मनसेच्या असंतुष्ट आणि पक्षातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांंना आश्वासने आणि आमिषे देऊन रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. इतकेच नव्हे तर पक्षाचे शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मनसे आणि अन्य पक्षांतील अनेक इच्छुक प्रवेश करणार होते. मात्र, दानवे यांनी नाशिकला येऊच नये यासाठी भाजपातील काही स्थानिक नेते प्रयत्नशील असल्याचे मनसेतून येऊ इच्छिणाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. अखेरीस शुक्रवारी दानवे यांनीच निरोप धाडला आणि तूर्तास कार्यक्रम पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. गुरुवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात दानवे यांच्या पायाला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या दौरा स्थगित होण्यामागे राजकीय कारण वा सल्ला नसल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. सदरचा दौरा रद्द झाल्याने प्रवेश सोहळ्याच्या तयारीवर पाणी फेरले गेले आहे, तर दुसरीकडे नामुष्की टळल्याने मनसेच्या स्थानिक नेत्यांना तूर्तातूर्त दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP admits 'Sankrant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.