पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावा
By Admin | Updated: November 11, 2015 22:00 IST2015-11-11T21:59:01+5:302015-11-11T22:00:07+5:30
येवला : न्याहारखेडेत ऐन दिवाळीत ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण

पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावा
येवला : तालुक्यातील न्याहारखेडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सात व्यक्तींसह गायीला चावा घेतला. यात तीन महिला व चार पुरुष आहेत. कुत्र्याने सणाच्या दिवशीच गावातील सात जणांना चावा घेतल्याची घटना घडल्याने आनंदावर विरजण पडले असून, कुत्र्याची परिसरात दहशत पसरली आहे.
बुधवारी पहाटे ४ वाजता काळ्या रंगाचे एक कुत्रे वेगाने धावत आले आणि त्याने प्रथम देवीदास देवरे याला चावा घेतला. न्याहारखेडे येथे तीन महिला व तीन पुरुषांना चावा घेतला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार चावा घेणारी कुत्री वेगवेगळ्या रंगाची
होती. या सहा रुग्णांना येवला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. ग्रामीण अधीक्षक डॉ. एस.डी. सदावर्ते, डॉ. पंकज पाटील यांनी जखमी व्यक्तीवर औषधोपचार केले. परंतु चावा घेणारे कुत्रे हे पिसाळलेले असल्याने रुग्णांना नाशिक येथील सरकारी रु ग्णालयात पुढील उपचार घेण्यासाठी पाठवण्यात आले. अॅड.माणिकराव शिंदे व नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी जखमींची विचारपूस करीत त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देत नाशिक येथे रवाना केले.
न्याहारखेडा येथील बाबाबाई गंगाधर देवरे (९०), शोभाबाई शंकर देवरे (५०), पद्माबाई साहेबराव आहिरे (५०), सुखदेव शंकर गरुड (८०), सागर सुदाम देवरे (२०), देवीदास कृष्णा देवरे (१५), अप्पासाहेब दत्तू देवरे (२७) यांना तसेच एका गायीला या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे.
येथील ग्रामस्थांनी या पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु कुत्री सापडली नाहीत. (वार्ताहर)