बिटको रुग्णालयात तोडफोड

By Admin | Updated: September 5, 2015 00:32 IST2015-09-05T00:31:37+5:302015-09-05T00:32:27+5:30

महिलेच्या मृत्यूने संताप : चेंगराचेंगरीत चार जण जखमी

Bitco broke into the hospital | बिटको रुग्णालयात तोडफोड

बिटको रुग्णालयात तोडफोड

नाशिकरोड : मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलेल्या गर्भवती महिलेचा शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने बिटको रुग्णालयाच्या दरवाजे-खिडक्यांच्या काचा फोडून, उपचार साहित्याची तोडफोड केली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला रुग्ण व जमावाच्या धक्काबुक्कीमध्ये रुग्णालयाचा कर्मचारी, दोन खासगी रक्षक जखमी झाले आहेत. यामुळे रुग्ण, कर्मचारी, नातेवाईक यांच्यात चांगलीच घबराट पसरली होती.
जेलरोड आम्रपाली झोपडपट्टीत राहणारी विवाहिता राणी संदीप लाखे (वय २२) ही ९ महिन्यांची गरोदर असून तिला हृदयविकाराचादेखील आजार होता. राणी लाखे हिला गुरुवारी मध्यरात्री त्रास होऊ लागल्याने बिटको रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे तिला जास्त त्रास होऊ लागल्याने वैद्यकीय उपचार करून सकाळी ८ वाजेच्या सुमारास अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना पावणेनऊ वाजेच्या सुमारास गरोदर राणी लाखे हिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
रुग्णालयात तोडफोड
त्यानंतर काही वेळाने संतप्त जमावाने रुग्णालयात धाव घेऊन मयत राणी लाखे ही बेडवरून पडल्याने व रुग्णालयाच्या हलगर्जी- पणामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप करत प्राथमिक अपघात विभाग कक्षाच्या खिडकीच्या काचा फोडून तोडफोड करण्यास सुरुवात केली. तेथील स्ट्रेचर, वैद्यकीय साहित्याची मोडतोड करत युवकांच्या जमावाने अतिदक्षता विभागाकडे जाताना आजूबाजूच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर अतिदक्षता विभागाचा काचेचा दरवाजा व खिडक्यांच्या काचा फोडल्या. जमावाच्या आरडाओरडीमुळे व तोडफोडीमुळे रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी प्रचंड घाबरून गेले. डॉक्टर, रुग्ण, कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कक्षात, खोलीमध्ये स्वत:ला वाचविण्यासाठी बंद करून घेतले होते. यावेळी उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मोडतोड केल्यानंतर काहीजणांनी बॉम्ब-बॉम्ब अशी ओरड करण्यास सुरुवात केल्याने रुग्णालयात उपचारानंतर रुग्ण, नातेवाईक, उपचार, तपासणी करण्यास आलेले रुग्ण, नागरिक, महिला हे सर्वजण घाबरून रुग्णालयाबाहेर पळू लागले. रुग्णालयाचा मुख्य दरवाजा सकाळी बंद ठेवण्यात येत असल्याने रुग्ण केसपेपर घेतात त्या ठिकाणाहून सर्वजण बाहेर पळू लागले. यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक महिला रुग्ण, लहान मुले खाली पडले. यामुळे रुग्णालय आवारात व बाहेर रस्त्यावर प्रचंड भीतीचे, घबराटीचे वातावरण पसरले होते. रूग्णालयात तोडफोड झाल्याची माहिती मिळताच नगरसेवक सुनील वाघ, हरिष भडांगे यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच सदर घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे मोठ्या फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.
चारजण जखमी
बॉम्बच्या अफवेमुळे पळताना चेंगराचेंगरीमध्ये उपचार घेण्यासाठी आलेली महिला रुग्ण रूक्साना बी. कलीम कुरेशी रा. गुलजारवाडी सुभाषरोड ही जखमी झाली आहे. तर धक्काबुक्कीमध्ये वॉर्डबॉय शिवाजी ठुबे, खासगी सुरक्षारक्षक नजमा पठाण, सागर भोळे हे चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी मयत रुग्णाच्या नातेवाइकांची समजूत काढली. तसेच डॉक्टरांनी नातेवाइकांना मयत होण्याचे कारण समजावून सांगितल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर बिटको रुग्णालयातील तणाव हळूहळू निवळून दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली; मात्र या घटनेमुळे सकाळी तपासणी, चाचणी करण्यासाठी आलेले रुग्ण, नातेवाईक तपासणी न करताच निघून गेले. (प्रतिनिधी)

Web Title: Bitco broke into the hospital