कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर वाढला मुलींचा जन्मदर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:02+5:302021-09-04T04:19:02+5:30

नाशिक : जिल्ह्यात गत दोन वर्षे सातत्याने घटलेला मुलींचा जन्मदर गत वर्षातही घटला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुलींच्या ...

Birth rate of girls increased after the second wave of corona! | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर वाढला मुलींचा जन्मदर!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर वाढला मुलींचा जन्मदर!

नाशिक : जिल्ह्यात गत दोन वर्षे सातत्याने घटलेला मुलींचा जन्मदर गत वर्षातही घटला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुलींच्या जन्मदरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अनधिकृतपणे होणाऱ्या गर्भपातामध्ये मुलगी नको असणाऱ्यांचेच प्रमाण अधिक असते. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरही जन्मदर घट कायम राहिली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धास्तीने, तसेच त्यानंतरही कन्या जन्मदरात लक्षणीय अर्थात तब्बल १५ इतकी वाढ झाली आहे.

नाशिक शहरात जन्मदरात २०१८-१९ या वर्षी १००० मुलांमागे मुलींचा जन्मदर ९२३ इतका होता. त्यानंतर २०१९-२० या वर्षी मुलींच्या जन्मदरात ३ ने घट येऊन जन्मदर ९२० वर पोहोचला होता, तर २०२०-२१ या पहिल्या कोरोना लाटेनंतर मुलींच्या जन्मदरात तब्बल ८ ने घट येऊन ते प्रमाण ९१२ वर पोहोचले होते, तर २०२१ च्या एप्रिल महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसू लागल्यानंतर मात्र मुलींच्या जन्मदरात तब्बल १५ ने वाढ हाेऊन गत ५ महिन्यांत सरासरी ९२७ इतका जन्मदर राहिला आहे.

इन्फो

५५६ पैकी ३१७ साेनोग्राफी केंद्रे सुरू

गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायद्याच्या तरतुदीनुसार सोनोग्राफी केंद्राला नोंदणी आवश्यक असते. त्यानुसार शहरातील ५५६ सोनोग्राफी केंद्रांपैकी २१५ केंद्रे कायमस्वरूपी बंद आहेत, तर २४ केंद्र कोर्ट केस आणि इतर कारणांमुळे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत केवळ ३१७ अधिकृत सोनोग्राफी केंद्रे सुरू आहेत.

इन्फो

नैसर्गिकरीत्या मुलींचा जन्मदर असतो अधिक

वैज्ञानिकदृष्ट्या निसर्गत: मुलींचा जन्मदर हा मुलांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे गर्भपातबंदी असलेल्या बहुतांश देशांमध्ये मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे १०२५ ते १०५० इतका असतो. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये आजही मुलींचा जन्मदर ९०० पेक्षाही कमी आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात हे प्रमाण ९२५ च्या आसपास असून, नाशिक जिल्ह्यातही हे प्रमाण साधारण राज्याच्या सरासरीच्या प्रमाणात कायम आहे.

कोट

- मुला-मुलींचे प्रमाण समतोल राहावे यासाठी गर्भलिंग निदानाला प्रतिबंध करण्यात आला आहे. सोनोग्राफी केंद्राची पाहणी करून नियमित तपासणी करून त्या प्रमाणावर दर महिन्याला लक्ष ठेवले जाते, तसेच तपासणी करून काही दोष आढळून आल्यास कारवाई करण्यात येते, तसेच कुठे अवैधरीत्या गर्भलिंग निदान होत असल्यास 18002334475 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधल्यास तत्काळ दखल घेतली जाते.

डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

-----------------

-------------------

वर्ष २०१८, मुलींचा जन्मदर ९२३

वर्ष २०१९, मुलींचा जन्मदर ९२०

वर्ष २०२०, मुलींचा जन्मदर ९१२

वर्ष २०२१ ऑगस्टपर्यंत जन्मदर ९२७

(मुलींच्या जन्मदराचे प्रमाण हे प्रति १ हजार मुलांमागे आहे. )

Web Title: Birth rate of girls increased after the second wave of corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.