थेंबभर पाण्यासाठी पक्ष्यांची होते ससेहोलपट
By Admin | Updated: May 22, 2014 17:15 IST2014-05-21T23:26:40+5:302014-05-22T17:15:24+5:30
रेडगाव खुर्द : सततच्या अल्पपावसाने विहिरी-बारवा, बोअरवेल, बंधारे कधीच कोरडे पडले असल्याने सध्या सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.

थेंबभर पाण्यासाठी पक्ष्यांची होते ससेहोलपट
रेडगाव खुर्द : सततच्या अल्पपावसाने विहिरी-बारवा, बोअरवेल, बंधारे कधीच कोरडे पडले असल्याने सध्या सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पशु-पक्ष्यांनाही त्याची झळ बसत असून, थेंबभर पाण्यासाठी पक्ष्यांना केविलवाणा आटापिटा करावा लागत आहे. गेल्या काही वर्षातील पावसाचे घटते प्रमाण व अनियमितता यामुळे बंधार्यांचा सांडवा ओसंडून वाहिला नाही. परिणामी जलसाठ्यात थोड्याफार प्रमाणात साचलेले पाणी अल्पजीवी ठरते, तर विहिरी, बोअरवेल यांनी हिवाळ्यातच तळ गाठला. अशा परिस्थितीत बख्खळ पाण्याअभावी आहाळांची जागा बंदिस्त टाक्यांनी घेतली. अनेकजण सध्या विकत पाणी आणून कुटुंबासह पशुधनाची तृष्णा भागवत आहे तसेच विहिरीतून पाणी खेचण्यापासून घर व टाक्यापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी आणले जाते. अशा विविध कारणाने कुठेही उघड्यावर पाण्याचे डबके साचत नाही. सर्वत्र पाण्याचा ठणाणा आहे. त्यामुळे एरवी सहसा जवळ न येणारे पक्षी धुणीभांडी करताना प्रसंगी महिला, मुले, नागरिक पाणी वाहत असताना नजर चुकवून डोक्यावरील हंडा, बादलीतील पाण्यावर तृष्णा भागवताना दिसतात. तसेच बंदिस्त टाक्यांचा नळातून गळणारा वा टाकीतून पाझरणार्या थेंबाला चोचीत घेण्यासाठी पक्ष्यांना केविलवाणा आटापिटा करावा लागत असल्याचे पाहवयास मिळते. पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट दिसत असताना रेडगाव येथील पुरोहित सुधाकर कुलकर्णी हे अल्पशा प्रयत्नातून दिवसभरात काही तुषार्त पक्ष्यांना दिलासा देत आहे. कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून भिंतीवर प्लॅस्टिकच्या छोट्या भांड्यात पाणी भरून ठेवतात. चिमणी - कावळे व इतर पक्षी येऊन आपली तृष्णा भागवतात. दिवसभरात ८-१० वेळेस या भांड्यात पाणी भरतात. दररोज पाच-पन्नास पक्ष्यांच्या कोरड्या घशाला ओलावा देणारा कुलकर्णी यांचा भूतदयेचा छोटासा प्रयत्न आदर्शवत आहे.(वार्ताहर)