बिहारचा निकाल; केंद्राला चपराक

By Admin | Updated: November 9, 2015 21:56 IST2015-11-09T21:56:45+5:302015-11-09T21:56:58+5:30

राधाकृष्ण विखे-पाटील : ही तर परिवर्तनाची नांदी; राज्याला सूचक इशारा

Bihar's result; Center at the peak | बिहारचा निकाल; केंद्राला चपराक

बिहारचा निकाल; केंद्राला चपराक

नाशिक : देशातील असहिष्णुतेचे वातावरण, केंद्र सरकारचे सर्व आघाड्यांवरील अपयश यामुळे बिहारच्या जनतेने महाआघाडीला कौल दिला आहे़ सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकारविरोधात परिवर्तनाची ही नांदी असून, यातून केंद्र सरकारला बिहारी जनतेने चांगलीच चपराक दिली असून, महाराष्ट्रातील राज्य सरकारलाही यातून सूचक इशारा मिळेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले़ बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पत्रकारांशी ते बोलत होते़
विखे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गत बिहार विधानसभा निवडणुकीत केवळ चार जागा मिळाल्या होत्या़ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये केलेल्या प्रचारामुळे काँग्रेस पक्ष १८ जागांवर पोहोचला़ दिल्ली विधानसभेनंतर बिहारमध्येही भाजपचे पानिपत झाले असून, हा निकाल म्हणजे केंद्र सरकारचे अपयश आहे़ निवडणुकीचा हा निकाल लोकचळवळीवर शिक्कामोर्तब करणारा असून, तिरस्कारावर प्रेमाने विजय असे या निकालाचे विश्लेषण करता येईल़
केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील राज्य सरकारही सर्व आघाड्यांवर अपयशी ठरते आहे़ या सरकारच्या वर्षपूर्तीचे मूल्यमापन म्हणजे समाजशास्त्राच्या पेपरमध्ये भूगोलाचे उत्तर लिहिण्यासारखेच आहे़
मराठवाड्यातील विद्यार्थिनीने बस पाससाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्त्या केल्यानंतर राज्य सरकारला जाग आली व मोफत पास योजना सुरू केली़ इतरत्र अशीच परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्येची सरकार वाट बघते आहे की काय? यातून सरकारचा असंवेदनशीलपणा समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यातही राज्य सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारला ‘मेक इन महाराष्ट्र’ म्हणजे नेमके काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे विखे-पाटील म्हणाले़ यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Bihar's result; Center at the peak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.