मोठ्या टीचरने आम्हाला खोटे बोलायला सांगितले!

By Admin | Updated: February 25, 2015 23:59 IST2015-02-25T23:59:02+5:302015-02-25T23:59:20+5:30

विद्यार्थिनींचा जबाब : विडी कामगार मनपा शाळेतील प्रकरणाला वळण

The big teacher asked us to lie | मोठ्या टीचरने आम्हाला खोटे बोलायला सांगितले!

मोठ्या टीचरने आम्हाला खोटे बोलायला सांगितले!

नाशिक : ‘मोठ्या टीचरने आम्हाला खोटे बोलायला सांगितले. वर्गखोलीचा दरवाजा बंद करून आमच्याकडून भोर सरांविषयी काहीबाही बोलून घेतले आणि त्याचे रेकॉर्डिंग करत बदनामीची धमकी दिली’, असा जबाब पंचवटीतील विडी कामगारनगरमधील मनपा शाळा क्रमांक ४५ मधील दहा-बारा विद्यार्थ्यांनी बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्यासमोर नोंदवल्याने शिक्षक विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, विद्यार्थिनींच्या पालकांनी जोपर्यंत मुख्याध्यापक लता गरड यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत मुलींना शाळेत न पाठविण्याचा पवित्रा घेतला आहे.
विडी कामगारनगरमधील मनपा शाळा क्रमांक ४५ मधील शिक्षक मुरलीधर गोपीनाथ भोर यांच्याविरुद्ध विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणे, त्यांना अश्लील छायाचित्रे दाखविणे या कृत्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक लता गरड यांनी आडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित शिक्षक भोर यांच्याविरुद्ध लहान मुलांचे लैंगिक अपराध संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्याचबरोबर शाळेत दंगल घडवून आणल्याबद्दल काही पालकांविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून, ज्या विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप झाला होता, त्याच विद्यार्थिनींनी आपल्या पालकांसमवेत बुधवारी महापालिकेचे राजीव गांधी भवन गाठले आणि आयुक्तांच्या अनुपस्थितीत नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्यासमोर आपली कैफियत मांडली.
विद्यार्थिनींनी सांगितले, ‘मोठ्या टीचरने आम्हाला खोटे बोलायला सांगितले. आम्ही जर तसे बोललो नाही, तर व्हॉट्स अ‍ॅपवरून तुमची बदनामी केली जाईल’, अशी धमकी दिली. त्यावर अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी मोठ्या टीचर कोण, असा प्रश्न केला असता विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक लता गरड यांचे नाव घेतले आणि गरड यांच्याविरुद्ध पाढाच वाचायला सुरुवात केली.
याचवेळी पालकांनीही गरड मॅडम या प्रशासनाधिकारी कुंवर मॅडम आपल्या मैत्रीण असल्याने माझे काहीही होणार नाही, असे सांगत असल्याचेही कथन केले. पालक शिक्षक समितीचे सदस्य अमोल जगळे यांनीही शाळेच्या कारभाराबद्दल माहिती दिली. दरम्यान, पालकांनी जोपर्यंत गरड यांना सक्तीच्या रजेवर अथवा त्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत मुलींना शाळेत न पाठविण्याचा इशारा दिला. यावेळी अनिल चव्हाण यांनी सदरचे जबाब आणि निवेदन आयुक्तांपर्यंत पोहोचवून चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपआयुक्त दत्तात्रेय गोतिसे, नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सदर विद्यार्थिनी व पालकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलनाचा पवित्रा घेत मुख्याध्यापिका आणि प्रशासन अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)

Web Title: The big teacher asked us to lie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.