अझहर शेख, नाशिक
नाशिक शहरातील तपोवन येथे असलेल्या लोकेश लॅमिनेटिस या प्लायवूडच्या फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भयंकर आहे की सगळा परिसर ज्वाळांनी आणि धुराच्या लोटांनी भरून गेला आहे. अग्निशमन दलाचे १८ बंब घटनास्थळी पोहोचले असूनही ही आग नियंत्रणात यायला तयार नाही.
तपोवन परिसरातील रहिवासी भाग असलेल्या साई कोर्ट नावाच्या गृहप्रकल्पाच्या शेजारी लोकेश लॅमिनेटिस कंपनी आहे. या कंपनीत मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास आगीचा भडका उडाला. घटनास्थळी अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी दाखल झालेले आहेत. पोलीस प्रशासनाने देखील मदत आणि बचावकार्यात झोकून दिले आहे.
अग्निशमन दलाचा सप्ताह सुरू असतानाच, नाशिकमध्ये हा अग्निकल्लोळ उसळला आहे. नाशिक शहरातील महापालिकेच्या सर्व केंद्रांवरील प्रत्येकी तीन असे सुमारे १८ बंब घटनास्थळी आहेत. तसेच सिन्नर एमआयडीसी चांदवड अंबड एमआयडीसी तसेच करन्सी नोट प्रेसच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे बंब देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहेत. दीड वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्याला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीए. प्लायवूडचा मोठा साठा या गोडाऊनमध्ये असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आतापर्यंत घटनास्थळी दाखल झालेल्या १० ते १२ बंबांपैकी सुमारे सात ते आठ बंबांनी पाच पेक्षा जास्त फेऱ्या करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे.
नाशिक शहरांमध्ये यंदाच्या वर्षातील ही पहिली भीषण आगीची घटना आहे. या दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवलेला आहे. माल उतरवण्यासाठी आलेला ट्रक जळाल्याचे सांगितले जात आहे.