ब्रह्मगिरी पर्वतावर पोहचली ‘सायकल’
By Admin | Updated: October 4, 2015 23:59 IST2015-10-04T23:58:30+5:302015-10-04T23:59:57+5:30
सायकल पर्यटन : शंभर सायकलस्वारांनी दोन तासांत गाठले त्र्यंबकेश्वर

ब्रह्मगिरी पर्वतावर पोहचली ‘सायकल’
नाशिक : शहरामध्ये सायकल पर्यटन विकसित व्हावे, सायकलची आवड नागरिकांमध्ये अधिकाधिक वाढीस लागावी आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार मिळावा, या हेतूने ‘नाशिक सायकलिस्ट’च्या वतीने नाशिक-ब्रह्मगिरी अशी सायकल फे री आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध वयोगटांतील सुमारे शंभर सायकलस्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दोन दिवसांपूर्वीच शहरामध्ये नाशिक सायकलिस्ट या सायकल चळवळ चालविणाऱ्या संघटनेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘सायकल डे’ची मुहूर्तमेढ सायकल फेरीच्या माध्यमातून रोवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सालाबादप्रमाणे नाशिक-ब्रह्मगिरी अशी सायकल फेरी रविवारी (दि.४) सकाळी साडेसहा वाजता अनंत कान्हेरे मैदानापासून सुरू करण्यात आली. यामध्ये आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तरुणांची संख्या लक्षणीय होती. सायकलफेरीच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तेथील निसर्गसौंदर्यात अधिकच भर पडली होती. त्यामुळे हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्याच्या लागलेल्या ओढीने अवघ्या दोन तासांमध्ये सर्व सायकलस्वारांनी पेगलवाडी-पहिने गाठले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता उत्कृष्टरीत्या तयार झाल्याने सर्व सायकलस्वारांनी यावर्षी आनंद व्यक्त करत मोठ्या उत्साहात सायकल ब्रह्मगिरीच्या दिशेने दामटविली. गौतम ऋषींच्या मंदिरापासून पुढे वर डोंगरापर्यंत सायकलस्वारांनी सायकल खांद्यावर घेऊन ब्रह्मगिरी सर करावी लागली. यामध्ये विशाल उगले, महापालिकेचे अभियंता उत्तम पवार, विजय भावसार, डॉ. नारायण देवगावकर, डॉ. साधना पाटील, डॉ. श्वेता भिडे यांच्यासह आदि सहभागी झाले होते. ब्रह्मगिरीला वळसा घातल्यानंतर सर्व सायकलस्वारांनी कुशावर्तावर स्नान करून पुन्हा सायकलने नाशिक गाठले.