नाशिक : नाशिक तालुक्यातील पुर्व भागात दारणानदीकाठालगतच्या बाभळेश्वरपासून तर थेट दोनवाडेपर्यंत बिबट्याची दहशत मागील महिनाभरापासून कायम आहे. या भागात सातत्याने बिबट्याकडून लहान मुलांवर हल्ले झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे. वनविभागाकडून संपुर्ण दारणाकाठालगत पंधरा ते वीस पिंजऱ्यांची जणू तटबंदीच करण्यात आली आहे; मात्र अद्याप बिबट्या जेरबंद झालेला नाही. बिबट्याचा माग काढून त्याला पिंज-यात जेरबंद करणे अथवा बेशुध्द करण्यासाठी बोरिवलीच्या पथकाची अतिरिक्त मदत पुन्हा घेण्यात आली आहे.सामनगाव येथील पोलीस पाटील मळ्यात रविवारी (दि.२८) संध्याकाळी बिबट्याने ओम कडभाने या चार वर्षीय मुलावर झडप घातली. आजोबा बबन जगताप यांच्यासह गावक-यांनी आरडाओरड करत बिबट्यामागे धाव घेतली. यामुळे सुदैवाने बिबट्याने ओमला जबड्यातून सोडून देत धूम ठोकली. या घटनेत ओमचे प्राण बालंबाल बचावले. बारा दिवसांपुर्वीच या गावापासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बाभळेश्वरमध्ये गुंजन नेहेरे या तीन वर्षीय बालिके चा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.