शहराध्यक्ष पदासाठी भुजबळांकडून चाचपणी
By Admin | Updated: June 12, 2014 01:04 IST2014-06-12T01:02:35+5:302014-06-12T01:04:22+5:30
शहराध्यक्ष पदासाठी भुजबळांकडून चाचपणी

शहराध्यक्ष पदासाठी भुजबळांकडून चाचपणी
नाशिक : लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी राजीनामा दिल्याने त्यांचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी चाचपणी सुरू केली असून, बुधवारी त्यांनी काही निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर विभागीय अध्यक्षांनीही त्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. या नेमणुकीवरून पक्षात नवा-जुना वाद उफाळून आला आहे.
शहराध्यक्षपदी पक्षस्थापनेपासून कार्यरत असलेल्या व्यक्तीचीच निवड करण्यात यावी अन्यथा पदाचे राजीनामे देऊ असा इशारा यापूर्वीच सर्व विभागीय अध्यक्ष तसेच विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षांची नियुक्ती पक्षात कळीचा मुद्दा झाला असून, वाढत चाललेला तिढा पाहता खुद्द छगन भुजबळ यांनाच त्यात लक्ष घालावे लागले आहे. आज सकाळी भुजबळ फार्म येथे काही निवडक पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेऊन एकमताने नाव सुचविण्याची सूचना केली. या पदासाठी अर्जुन टिळे यांचे नाव एका गटाने पुढे केले असून, पक्षात अन्यही इच्छुक आहेत. परंतु पक्षस्थापनेपासून कार्यरत असलेल्या दुसऱ्या गटाचा टिळे यांना विरोध आहे. शिवसेनेतून आलेल्यांनाच पदे दिली जात असल्याची तक्रार हा गट करीत असल्यामुळे कोणत्याच नावावर एकमत होत नाही. त्यामुळे भुजबळ यांनी सर्वसंमतीने येत्या दोन दिवसांत नाव सूचवा असे सांगून, विधिमंडळ अधिवेशन आटोपल्यावर नियुक्ती करण्याचे संकेत दिले.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यासाठी शहराध्यक्षांची नेमणूक करण्याचे घाटत असताना, उलट या नेमणुकीवरूनच पक्षांतर्गत गटबाजी वाढत असल्याने नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, सर्व विभागीय अध्यक्षांनीही भुजबळ यांची भेट घेऊन शहराध्यक्ष नेमणुकीबाबत आपले म्हणणे मांडले. (प्रतिनिधी)