साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भुजबळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:38+5:302021-02-05T05:46:38+5:30
नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त ...

साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भुजबळ !
नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी केली. तसेच स्वागत समितीशिवाय अन्य समित्यांची आणि अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आल्याचे टकले यांनी सांगितले.
नाशिक शहरात होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून भुजबळ यांची तर उपाध्यक्ष म्हणून गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव डाॅ. मो. स. गोसावी, राज्याचे मंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, प्राचार्य प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीवर नाशिकचे महापौर, जिल्हाधिकारी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. सल्लागार प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील सर्व खासदार, सर्व आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या ३९ समित्यांचे गठन केले जाणार असल्याचे टकले यांनी सांगितले.
या समित्यांसाठी नाशिकमधील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी अजून नागरिकांनी पुढाकार घेतल्यास त्यांचादेखील अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून नितीन मुंडावरे यांची साहित्य संमेलनातील प्रशासकीय कामकाजासाठी विशेष नियुक्ती करण्यात आल्याचेदेखील टकले यांनी नमूद केले.
इन्फो
कार्यवाह जातेगावकर, कार्याध्यक्ष टकले
साहित्य संमेलनाच्या निमंत्रणापासून नाशिकला संमेलन घेऊन येण्यात सर्वाधिक मोलाचे योगदान असलेले लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांची संमेलनाच्या कार्यवाहपदी, तर विश्वस्त हेमंत टकले यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षांना सल्लागार म्हणून सहकार्याध्यक्षपदावर ॲड. विलास लोणारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सर्व समित्यांचे समन्वयक म्हणून विश्वास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इन्फो
स्वागत समिती सदस्यांसाठी शुल्क
संमेलनासाठी निधी गोळा करण्याच्या दृष्टीने जे नागरिक ५ हजार रुपये शुल्क भरतील त्यांना स्वागत समिती सदस्य म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. त्यात कोणताही नियम नसून जो नागरिक निर्धारित शुल्क देईल, त्याला स्वागत समिती सदस्य म्हणून नियुक्ती दिली जाईल. तसेच जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांना मानद सदस्यत्व दिले जाणार आहे. त्यांना मात्र या सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.