भुजबळांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक
By Admin | Updated: September 15, 2015 22:42 IST2015-09-15T22:41:13+5:302015-09-15T22:42:47+5:30
राष्ट्रवादीचा चक्काजाम : जिल्ह्यात १९ ठिकाणी आंदोलने

भुजबळांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक
नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थतीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात १९ ठिकाणी रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
नाशिक शहरात मुंबई महामार्गावर द्वारका व जत्रा हॉटेल येथे रास्ता रोको करण्यात आल्याने शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ, आमदार हेमंत टकले, आमदार जयंत जाधव, माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली द्वारका चौफुलीवर शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा, तर जत्रा हॉटेल चौफुलीवर माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली सटाणा शहरात रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले की, राज्यात मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. पाणीटंचाई जाणवत असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, सक्तीची वीज वसुली थांबवावी, विद्यार्थ्यांची फी माफ करावी आदि मागण्या सरकारने तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.
आमदार भुजबळ यांच्या उपस्थितीत तासभर रास्ता रोको करण्यात येऊन नंतर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत टकले, आमदार जयंत जाधव, मनपा विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे, नगरसेवक विनायक खैरे, विक्रांत मते, मनोहर बोराडे, रंजन ठाकरे अर्जुन टिळे, वैभव खैरे, संतोष सोनपसारे, सचिन महाजन, राजेंद्र महाले, छबू नागरे, संजय खैरनार, राजू शेख, शोभा मगर, प्रेरणा बलकवडे, जि. प. सदस्य जयश्री पवार, सुनीता निमसे, प्रेरणा बलकवडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)