भोसलेंची सहकारात अहेरांवर बाजी
By Admin | Updated: March 17, 2016 23:44 IST2016-03-17T23:41:23+5:302016-03-17T23:44:09+5:30
जिल्हा मजूर सहकारी संघ : राजकारणात केला शब्द ‘खरा’

भोसलेंची सहकारात अहेरांवर बाजी
गणेश धुरी नाशिक
राजकारणात कधी काळी ‘शब्दाला’ अनन्यसाधारण ‘किंमत’ होती. कालौघात राजकारणात बळावलेल्या मनी, मसल आणि पॉवरमुळे ही शब्दाची किंमत कमी कमी होत गेली. सहकार क्षेत्राला तर स्वार्थाने भ्रष्टाचाराचे स्वरूप आलेले असतानाच गुरुवारी झालेल्या जिल्हा मजूर सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मागील काळात दिलेला शब्द आणि त्यापोटीची स्वाभिमानाची किंमत पणाला लावत जिल्हा बॅँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले यांनी सहकारात अनुभवी असूनही काहीसे चाचपडणाऱ्या प्रमोद मुळाणे यांना अध्यक्ष करून शब्द खरा करून दाखविला.
तसेही सध्या सहकार क्षेत्राला विविध घोटाळे आणि अपहारांचे ग्रहण लागलेले असताना आणि त्या अनुषंगाने अशा घोटाळेबाज कारभाऱ्यांना निवडणूक लढविण्यास दहा वर्षांची बंदी घालण्याचा कायदा संमत झालेला असताना सहकार क्षेत्रात एखाद्या सहकार धुरीणाने दिलेला शब्द खरा करून दाखविण्याची किमया केल्याची फार कमी उदाहरणे आहेत. जिल्हा मजूर सहकारी संघाच्या निवडणुकीत वर्षभरापूर्वीच झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या सामन्यात बागलाणच्या शिवाजी रौंदळ यांनी बाजी मारली होती.
अर्थात या निवडणुकीत प्रमोद मुळाणे हेच प्रमुख दावेदार असताना त्यांना राजेंद्र भोसले यांनी थांबण्यास सांगून पुढील वेळी अध्यक्ष पदाची संधी देणार असल्याचे सांगितले होते. कालच्या निवडणुकीत शिवाजी रौंदळ आणि जिल्हा परिषद सभापती केदा अहेर यांनी माजी अध्यक्ष व अनुभवी असलेल्या संपतराव सकाळे यांच्या बाजूने अध्यक्ष पदासाठी कौल दिलेला असतानाच राजेंद्र भोसले यांनी मात्र ‘आपण मागील काळात तुमच्यासाठीच प्रमोेद मुळाणे यांना थांबण्यास सांगितले होते, यावेळी काही झाले तरी त्यांना संधी द्यावी लागेल,’ असा कमालीचा आग्रह पॅनलचे नेते केदा अहेर व शिवाजी रौंदळ यांच्याकडे धरला. त्याचवेळी राजेंद्र भोसले यांनी संपतराव सकाळे यांना ‘तुम्ही पॅनलचे नेते आहात, सभागृहात आम्ही नाही, तुम्हालाच सर्वांनाच सांभाळावे लागणार आहे,’ असे सांगत उमेदवारी मागे घेण्यास सांगितले.
सकाळे यांनीही मग मनाचा मोठेपणा दाखवित, सहकारात ‘शब्दाला’ किंमत अशीच कायम राहण्यासाठी प्रमोद मुळाणे यांच्या अध्यक्ष पदाच्या नामनिर्देशन अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली.