‘भिवतास’ची पर्यटकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST2021-08-13T04:17:52+5:302021-08-13T04:17:52+5:30

लखमापूर : कोकण आणि डांग या दोन निसर्गरम्य विभागांच्या ८० किलोमीटरच्या पट्टीत ऊर्ध्व सह्याद्रीचे नाशिक ...

‘Bhivatas’ attracts tourists | ‘भिवतास’ची पर्यटकांना भुरळ

‘भिवतास’ची पर्यटकांना भुरळ

लखमापूर : कोकण आणि डांग या दोन निसर्गरम्य विभागांच्या ८० किलोमीटरच्या पट्टीत ऊर्ध्व सह्याद्रीचे नाशिक जिल्ह्यातील तीन तालुके सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वरचा पश्चिम भाग येतो. या तीनही तालुक्यांच्या भौगोलिक रचनेत कोकणचा रांगडेपणा तर दिसतोच त्यासोबत डांगचे देखणेपणही आढळते. या तीनही तालुक्यांवर सध्या निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. पावसाळ्यात हे सौंदर्य नव्या नवरीने नेसलेल्या हिरव्या शालूसारखे उठून दिसत असून ‘राजा भिवतास’ धबधबा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे.

येथून वाहणाऱ्या नार-पार, दमणगंगा अंबिका या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांच्या प्रवाहात असलेले धबधबे पांढऱ्या शुभ्र पाण्याने खळाळत आहेत. येथे बिलखस, पारुंडी, माजघरांसारखे नयनरम्य धबधबे आहेत; पण या सगळ्यात राजरच्या मुकुटावर शोभून दिसणाऱ्या हिऱ्यासारखा ‘राजा भिवतास’ धबधबा अधिकच खुललेला आहे.

नाशिकहून वायव्येकडे ७५ किलोमीटरवर असलेला हा धबधबा खऱ्या अर्थाने धबधब्याचा राजा म्हणावा असाच आहे. पारनदीची उपनदी असलेल्या शिवनदीवरचा हा धबधबा केळावन या गावाजवळ एका यू आकाराच्या दरीत कोसळतो. अंदाजे १०० ते १५० फूट असलेली ही दरी केळावन या गावापासून सुरू होते. ती थेट गुजरात सीमेवरच्या खोबळा या गावापर्यंत विस्तारत जाते.

‘भिवतास’चे सौंदर्य खरे उठून दिसते ते शिवनदीला पूर आल्यानंतर. आधीच्या कमी पावसाच्या झोताने वाहणारा हा धबधबा पहिला पूर आल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रवाहित होतो. आधीच त्याचे मंदपणाने वाहणारे रूप पूर आल्यानंतर अचानक पालटते. धबधबा रौद्र रूप धारण करतो. ‘भिवतास’चे हे भरलेले रूप सध्या सर्वच पर्यटकांना अनुभवास मिळत आहे.

इन्फो

भिवतास नावाची आख्यायिका

स्थानिक डांगी, कोकणी भाषेमध्ये ‘भिव’ याचा अर्थ ‘भीम’ होतो आणि ‘तास’ म्हणजे ‘नांगर.’ पांडवांना जेव्हा कौरवांनी राज्य द्यायचे नाकारले तेव्हा पांडवांनी वनप्रस्थान केले व शेती करण्यासाठी भीमाने या ठिकाणी नांगर धरला. ज्यामुळे ही यू आकाराची दरी पडली. या दरीत कोसळणारा धबधबा म्हणजे ‘भिवतास’ अशी समजूत येथील परिसरातील आदिवासी बांधवांची आहे.

फोटो- १२ भिवतास फॉल

Web Title: ‘Bhivatas’ attracts tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.