भक्तिरसात भाविक चिंब
By Admin | Updated: February 4, 2016 22:23 IST2016-02-04T22:22:42+5:302016-02-04T22:23:18+5:30
यात्रोत्सव : लाखो वारकरी निवृत्तिनाथांच्या चरणी लीन

भक्तिरसात भाविक चिंब
सुयोग जोशी त्र्यंबकेश्वर
धन्य धन्य निवृत्तिदेवा।
काय महिमा वर्णावा ।।
शिवे अवतार धरून ।
केले त्रैलोक्य पावन ।।
समाधी त्र्यंबक शिखरी ।
मागे शोभे ब्रह्मगिरी।।
निवृत्तिनाथांचे चरणी ।
शरण एका जनार्दनी ।।
या संत एकनाथांच्या अभंगातून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा महिमा वर्णिला आहे. खांद्यावर भगवी पताका, पांढरे धोतर, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर पांढरी टोपी आणि मुखी विठुनामाचा गजर करीत लाखो भाविक निवृत्तिनाथांच्या चरणी गुरुवारी लीन झाले. निमित्त होते निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचे. यात्रेनिमित्त संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहर व परिसर अक्षरश: भगव्या पताका आणि वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. गुरुवारी पहाटे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर चांदीच्या रथाचे महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, लक्ष्मण सावजी, निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, संजय धोंडगे, सिन्नरचे त्र्यंबकबाबा भगत, पुण्याच्या महिला कीर्तनकार सुप्रिया साठे आदि उपस्थित होते.