भिल्ल समाज संघटनेचा मोर्चा
By Admin | Updated: August 10, 2014 02:01 IST2014-08-10T02:00:50+5:302014-08-10T02:01:17+5:30
भिल्ल समाज संघटनेचा मोर्चा

भिल्ल समाज संघटनेचा मोर्चा
नाशिक : धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण दिल्यास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा शनिवारी (दि.९) भिल्ल समाज संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे आघाडी सरकारला देण्यात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छोटेखानी सभेत होऊन संघटनेच्या नेत्यांची भाषणे झाली.
दुपारी २ वाजेपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून भिल्ल समाज संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या दणका मोर्चास सुरुवात झाली. त्र्यंबक नाका, सीबीएसमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. यावेळी भिल्ल समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने त्यांचे लाड पुरवू नये. नाहीतर आदिवासी समाज आघाडी सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीतून सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाज हा प्राचीन काळापासून राजसत्तेत जगत आला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. आजही धनगर समाजातील व्यक्तींकडे कमीत कमी तीन ते चार लाखांची संपदा असते. ते सधन समाजातील आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांनी घटना लिहिली आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांवरही धनगर समाजाने आरोप केले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देता कामा नये. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य साईनाथ मोरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पवनराजे सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांचीही भाषणे झाली. या मोर्चात संघटनेचे महासचिव किरण ठाकरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन मोरे, अंकुश सोनवणे, बाळासाहेब बर्डे, रतन सोनवणे, अजित पवार, प्रदीप अहेर, विष्णू सोनवणे, संजय नवरे, नामदेव नवरे, बापू पवार, किरण मोरे, दत्तू पिंपळे, विजय तलवारे, श्रीराम माळी, संतोष निकम, मोतीराम सोनवणे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)