भिकमसिंह राजपूत हटाव मोहिमेसाठी धरणे
By Admin | Updated: May 21, 2014 00:28 IST2014-05-21T00:02:18+5:302014-05-21T00:28:16+5:30
पशुवैद्यकीय राजपत्रित संघटनेची मागणी

भिकमसिंह राजपूत हटाव मोहिमेसाठी धरणे
पशुवैद्यकीय राजपत्रित संघटनेची मागणी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेली अनावश्यक खरेदी तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निधीच्या उपलब्धतेनुसार औषध खरेदी न करता ती आवश्यक त्या मागणीनुसारच झाली पाहिजे; मात्र जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे थेट जिल्हा पातळीवरून औषध खरेदी करण्यात येते. तालुका स्तरावरून मागणी नोंदविण्यात येत नाही. तालुका स्तरावरून मागणी एकत्रित करून तालुकानिहाय मागणी जिल्हा स्तरावर पाठविणे आवश्यक असताना, सरसकट जिल्हा स्तरावरून औषधे व लस खरेेदीची प्रक्रिया राबविण्यात येते. तसेच मागणी पत्रकात नमूद केल्याव्यतिरिक्त औषधांची खरेदी किंवा त्यापेक्षा जास्त संख्या असलेली किंवा अनावश्यक औषधे संस्थांनी (पशुवैद्यकीय दवाखान्यांनी) स्वीकारू नयेत, अशा स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहेत त्याचेही पालन केले जावे. तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी डॉ. चोपडे व डॉ. निकम यांच्या बदल्या व प्रतिनियुक्त्या तसेच त्यांच्याकडे दिलेला अतिरिक्त पदभार, त्याप्रमाणेच पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या रजेचे अर्ज असताना त्यांचे विनावेतन करणे यांसह कामकाजातील अन्य मनमानी कारभाराला पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी वैतागले असून, त्यांच्या संदर्भात प्रशासनाने आवश्यक ती ठोस कारवाई करावी आदि मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डॉ. महाजन, डॉ. देशमुख, डॉ. चांदोरे, डॉ. ठाकूर, डॉ. ताडगे, डॉ. चौधरी, डॉ. पगार, डॉ. मोरे, डॉ. पझई आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)