भरतनाट्यम, सतारवादनाने नटला ‘स्वरनृत्य उत्सव’

By Admin | Updated: December 20, 2015 23:57 IST2015-12-20T23:51:41+5:302015-12-20T23:57:48+5:30

मैफल रंगली : डोळ्यांचे फेडले पारणे; कानही तृप्त

Bharatnatyam, Sartadananan natla 'Swarnaarthya Utsav' | भरतनाट्यम, सतारवादनाने नटला ‘स्वरनृत्य उत्सव’

भरतनाट्यम, सतारवादनाने नटला ‘स्वरनृत्य उत्सव’

नाशिक : विजेच्या चपळाईचे, रंगमंच व्यापून टाकणारे पदलालित्य अन् त्यानंतर रंगलेल्या स्वर्गीय सतारवादनाने रसिकांना स्वर आणि नृत्याच्या संगमाची अद्भुत प्रचिती दिली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मैफलीने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे तर फेडले; शिवाय कानांनाही तृप्त केले.
‘पंचम निषाद’ व ‘मंत्रा फाउंडेशन’च्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात आज रात्री हा ‘स्वरनृत्य उत्सव’ कार्यक्रम रंगला. ‘मंत्रा’कडून आयोजित ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित कार्यक्रम मालिकेतील हा वर्षातील अखेरचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात प्रख्यात नृत्यांगना मंदिरा मनीष यांनी भरनाट्यम नृत्य पेश केले, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक बुधादित्य मुखर्जी यांनी आपला वादनाविष्कार पेश केला.
मंदिरा मनीष यांनी नाठई रागातील गणेशवंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या पुष्पांजली, हंसध्वनी रागातील ‘नटराज कौतुकम’ने मैफलीवर पकड घेतली. संत तुकारामांच्या ‘पाय जोडून विटेवरी, कर ठेवुनिया कटेवरी’ या अभंगावर केलेल्या नृत्याला रसिकांनी विशेष दाद दिली. संस्कृत मधुराष्टकम, राग हिंदोलममधील तिलाना सादर केल्यानंतर मंदिरा मनीष यांनी ऐश्वर्या, शिवानी, रेणुका व नताशा या आपल्या सहकाऱ्यांसह पेश केलेल्या ‘मंगलम’ने सत्राचा समारोप झाला. मैथिली कृष्णकुमार यांनी गायन केले, तर सतीश कृष्णमूर्ती (मृदंग व घटम), एन. अभय (गिटार), भास्करन नागराजम (बासरी) यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या सत्रात इमदादखानी घराण्याचे ज्येष्ठ सतारवादक बुधादित्य मुखर्जी यांचे वादन रंगले. त्यांनी सतारीवर सादर केलेल्या राग दरबारी, मालकंसने आगळी उंची गाठली. त्यांना तोडीस तोड तबल्यावर साथ केली प्रख्यात वादक सौमेन नंदी यांनी. ‘पंचम निषाद’चे शशी व्यास यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंत्रा फाउंडेशनच्या दीपा त्रासी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Bharatnatyam, Sartadananan natla 'Swarnaarthya Utsav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.