गोदापात्रावर भरारी पथकांची नजर
By Admin | Updated: April 4, 2017 02:23 IST2017-04-04T02:23:48+5:302017-04-04T02:23:58+5:30
नाशिक : गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या गोदावरी कक्षामार्फत आता मंगळवार (दि.४) पासून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे

गोदापात्रावर भरारी पथकांची नजर
नाशिक : गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या गोदावरी कक्षामार्फत नागरिकांचे प्रबोधन झाल्यानंतर आता मंगळवार (दि.४) पासून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, गोदावरी संवर्धनासाठी दोन भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून, त्यांची नजर असणार आहे.
महापालिकेने गोदावरी नदीपात्रात घाण-कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्यांदा गुन्हा करताना सापडल्यास १ हजार रुपये तर पुन्हा तोच गुन्हा करताना दुसऱ्यांदा आढळून आल्यास ५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने काटेकोर अंमलबजावणीकरिता गोदावरी कक्षाची स्थापना करत त्यासाठी स्वतंत्र उपआयुक्ताची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, गेल्या तीन दिवसांपासून रामकुंड व घाट परिसरात महापालिकेच्या सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांना गोदापात्रात कपडे धुणे, घाण-कचरा टाकणे यापासून परावृत्त केले जात आहे. प्रबोधनानंतर आता मंगळवार, दि. ४ एप्रिलपासून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी सद्यस्थितीत ४० सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
त्यातील २० सुरक्षा रक्षक सकाळच्या सत्रात तर उर्वरित प्रत्येकी १० सुरक्षा रक्षक दुपार आणि सायंकाळच्या सत्रात नियुक्त केले जाणार आहेत. गोदापात्रावर नजर ठेवण्यासाठी आनंदवली ते थेट दसक-पंचकपर्यंत दोन भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.