भंडारदरा रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 00:56 IST2020-09-04T22:34:50+5:302020-09-05T00:56:06+5:30
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने याचा सर्वांनाच त्रास होत असल्याने रस्ते दुरुस्त न केल्यास या परिसरातील चाकरमान्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पिंपळगाव मोर ते अधरवडमार्गे टाकेद फाटा रस्त्याची झालेली दुरवस्था.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने याचा सर्वांनाच त्रास होत असल्याने रस्ते दुरुस्त न केल्यास या परिसरातील चाकरमान्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
घोटी-भंडारदरा रस्त्याचे घोटी ते पिंपळगाव मोरपर्यंतच कॉँक्रिटीकरण झाले. पिंपळगाव मोरपासून तालुक्यातील टाकेद, खेड, अधरवड, सोनोशी, वासाळी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी तसेच नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे कळसूबाई शिखर, रंदा, भंडारदरा, विश्रामगड, तांबकडा धबधबा, किल्ले बितनगड, अकोले आदी पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या या पिंपळगाव मोर ते वासाळी फाट्यापर्यंत रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी बुजवलेले खड्डे या वर्षी पुन्हा पावसाने मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहेत. तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घोटीला जोडणारा व टाकेद - खेड गटातील हा महत्त्वाचा मार्ग असल्याने परिसरातील वाहनचालक, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी, वयोवृद्ध ग्रामस्थ आदी नागरिकांना या रस्त्याने नेहमी ये-जा करावी लागते तसेच या गावांमधील रुग्णवाहिकांनादेखील याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेने परिसरातील नागरिक संतप्त आहेत. याची संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दखल घेऊन पिंपळगाव मोरपासून पुढे वासाळी फाट्यापर्यंत कमीत कमी १५ किमीची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, अशी मागणी येथील नागरिकांकडून, प्रवासी वाहनधारकांकडून प्रकर्षाने होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत पावसामुळे धामणगाव ते टाकेद हा रस्ता अतिशय दयनीय झाला आहे. त्यातच या रस्त्यामधून समृद्धी महामार्गाचे काम चालू असल्याने बराच रस्ता खोदला गेला आहे. टाकेद ते अडसरे या ठिकाणी रस्त्याला चार ते पाच फुटांचे खोल खड्डे पडलेले आहेत. किमान टाकेद ते अधरवड टाकेद फाटा, वासाळी ते पिंपळगाव मोर रस्ता, धामणगाव ते अडसरे टाकेद रस्ता, टाकेद ते म्हैसवळण रस्ता या सर्व रस्त्यांवरील प्रशासनाने किमान खड्डे तरी भरणे गरजेचे आहेत ही अपेक्षा या परिसरातील ग्रामस्थांची आहे.