समितीप्रश्नोत्तराने उडाली अधिकाऱ्यांची भंबेरी
By Admin | Updated: June 25, 2015 00:41 IST2015-06-25T00:27:51+5:302015-06-25T00:41:44+5:30
विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती दौरा

समितीप्रश्नोत्तराने उडाली अधिकाऱ्यांची भंबेरी
नाशिक : जिल्हा परिषदेत घेण्यात आलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची प्रश्नोत्तरात भंबेरी उडाल्याचे समजते. एका अधिकाऱ्याला तर माहिती देता न आल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळते.
नाशिक जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर विधान मंडळाची विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती आली आहे. या समितीची सकाळी अकरा वाजता आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोेरात सभागृहात झाली. तत्पूर्वी समितीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे स्वागत अध्यक्ष विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे व समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी आ.सानप यांनी जिल्हा परिषदेच्या तीनही पदाधिकाऱ्यांना आढावा बैठकीस बसण्याची अनुमती दिली. बैठकीत अनुदानित खासगी शिक्षण संस्थांनी कर्मचारी भरती करताना व अनुशेषअंतर्गत भरती करताना किती वर्षांपासून बिंदू नामावली तपासली आहे, अशी विचारणा माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना करण्यात आल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सोनकांबळे यांच्याकडून खुलासा मागविण्यात येईल, असे स्पष्ट केले.
यावेळी सुखदेव बनकर यांनी शाळा दत्तक योजनेसह शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. बैठकीस आ. महादेव जानकर, आ. रामराव वडकुते, आ. हरिसिंग राठोड यांच्यासह नऊ सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)