भालचंद्र नेमाडे यांणा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

By Admin | Updated: April 6, 2015 01:23 IST2015-04-06T01:21:45+5:302015-04-06T01:23:56+5:30

भालचंद्र नेमाडे यांणा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

Bhalchandra Nemedi Meena 'Gita Gaurav' award | भालचंद्र नेमाडे यांणा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

भालचंद्र नेमाडे यांणा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

नाशिक : इंग्रजी शाळांना कडाडून विरोध करून मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवे. इंग्रजीचा उदोउदो करणे हा निव्वळ मूर्खपणा असून, इंग्रजीच्या वापरातून आपण कनिष्ठ जातींच्या लोकांवर अत्याचार करीत असतो, असे परखड मत ‘ज्ञानपीठ’ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. संबळच्या तालावर कळवण तालुक्यातील भास्कर व सरस्वती गुंजाळ या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या कार्यक्रमात नेमाडे यांच्यासह सुरेश खानापूरकर, संजय पाटील, विजय हाके, विलास पाटील, स्मिता तांबे, दीप्ती राऊत, सुभाष नंदन, डॉ. दिग्विजय शाह, कृष्णा बच्छाव, अभिमन जाधव, सुनीता पाटील, अविनाश भामरे, प्रतिभा होळकर, कमलाकर देसले यांना ‘गिरणा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी नेमाडे यांनी भाषा, परंपरेतील आधुनिकता, जातिव्यवस्था आदि विषयांवर मुक्त चिंतन केले. जगात सर्वत्र मुलांना मातृभाषेतून शिकवले जात असताना, भारतात मात्र इंग्रजीचा उदोउदो केला जातो. तीन-तीन लाख फी भरून इंटरनॅशनल स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेतले जाते. असे शिक्षण घेणारे लोक हॉटेलांत झाडलोटीचे काम करतात. इंग्रजीमुळे मोठे सामाजिक दोष निर्माण होत आहेत. पुण्यातील शुद्ध मराठीचा आग्रह धरणे चुकीचे असून, बोलीभाषा याच खऱ्या शुद्ध भाषा आहेत, असेही ते म्हणाले. नोबेल, बुकर पुरस्कार मिळवणारे साहित्य खरे नसून, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते हेच खरे चिरंजीव साहित्य आहे. गावातले देशी सौंदर्य अनुभवण्याऐवजी आपण मुंबईत मोठेपण शोधतो, हे चुकीचे आहे. खांदेशी मराठी ही जुन्यात जुनी भाषा असून, ज्ञानेश्वरांपूर्वीही मराठी लिहिली जात असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत विदारक असून, त्यांच्यासाठी चळवळ सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारार्थींच्या वतीने स्मिता तांबे, कमलाकर देसले यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रतिभा नेमाडे, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, आनंद अ‍ॅग्रो समूहाचे अध्यक्ष उद्धव अहिरे, वैशाली अहिरे यांच्यासह पुरस्कारार्थी व्यासपीठावर उपस्थित होते. दीपक करंजीकर यांनी नेमाडे यांचा परिचय करून दिला. दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhalchandra Nemedi Meena 'Gita Gaurav' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.