भगूर सोसायटीच्या सचिवाचा साडेसात लाखांचा अपहार
By Admin | Updated: June 10, 2016 23:06 IST2016-06-10T23:06:08+5:302016-06-10T23:06:57+5:30
सभासद नसलेल्या व्यक्तींच्या नावे धनादेश : कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल

भगूर सोसायटीच्या सचिवाचा साडेसात लाखांचा अपहार
नाशिक : सोसायटी सभासद नसलेल्या व्यक्तींच्या नावे धनादेश काढून त्यावर पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन सुमारे साडेसात लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार भगूर अर्बन को-आॅप. क्रेडिट सोसायटीत घडला आहे़
भगूर क्रेडिट सोसायटीचे माजी सचिव जयराम चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१३ ते २०१६ या कालावधीत सोसायटीचे माजी सचिव संशयित संजय महाले यांनी सोसायटीचे सभासद नसलेल्या वा संस्थेत कुठलीही ठेव नसलेल्या व्यक्तींच्या नावे धनादेश तयार केले़
या धनादेशावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन हे चेक वटवून सात लाख ६० हजार ७४५ रुपये रक्कम काढून अपहार केला़ तसेच या व्यवहाराच्या नोंदी संस्थेच्या डे-बुकमध्ये केल्या नसल्याचे तत्कालीन विशेष लेखा परीक्षकांच्या अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत़ या प्रकरणी माजी सचिव संजय शंकर महालेविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)