भरदिवसा तळपल्या तलवारी-कोयते
By Admin | Updated: November 14, 2015 23:30 IST2015-11-14T23:28:51+5:302015-11-14T23:30:29+5:30
पंचवटी : पाथरवट लेनमध्ये गुंडांची सिनेस्टाइल दहशत; हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी

भरदिवसा तळपल्या तलवारी-कोयते
पंचवटी : किरकोळ कारणावरून भरदिवसा हातात तलवारी, कोयते घेऊन दहशत पसरवित टोळक्याने एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पाथरवट लेन येथे घडली आहे. रिक्षाचालकावर हल्ला करणाऱ्या चौघा संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांंचे साथीदार मात्र पसार झाले आहेत.
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घटना घडली. या घटनेत नागचौकात राहणारा गणेश शिंदे हा रिक्षाचालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सतीश विष्णू शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांवर बेदम मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरवट लेन येथील रहिवासी आकाश उर्फ बल्ल्या लाटे तसेच त्याचे साथीदार नदीम जहॉँगीर मुल्ला (रा. संजयनगर, हिरावाडी), केतन थोरात, रमेश गांगुर्डे, राहुल शिंदे, बबलू भवर, नाग्या, मन्ना आदिंनी किरकोळ कारणावरून कुरापत काढून पाथरवट लेन, गजानन चौक तसेच नागचौक परिसरात हातात तलवारी, कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिसरातून घराकडे रिक्षा घेऊन जाणाऱ्या शिंदे याला रस्त्यात अडवून त्याच्या डोक्यावर, मानेवर वार केले. पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे, हवालदार श्रीराम सपकाळ, नीलेश पवार, संजय राऊत, एस. एस. नरवडे आदिंनी धाव घेत संशयितांना हत्यारासह ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या सोमवार (दि.१६) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी समयसूचकता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, ताब्यात घेतलेले सर्वच संशयित गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून, त्यांची परिसरात दहशत असल्याची चर्चा आहे. त्यांना परिसरातील काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पाठबळ देत असून, त्यामुळेच दहशत वाढल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)