भरदिवसा सराफाला एक लाखाला लुटले
By Admin | Updated: December 24, 2016 01:41 IST2016-12-24T01:40:58+5:302016-12-24T01:41:14+5:30
भरदिवसा सराफाला एक लाखाला लुटले

भरदिवसा सराफाला एक लाखाला लुटले
नाशिक : वाटेत भेटलेल्या मित्रांसमवेत थांबून गप्पा मारत असताना एका सराफाला दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी कोयत्याचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना हनुमानवाडी-रामवाडीच्या लिंकरोडवर भरदिवसा घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चेतन दगडू सोनवणे (रा. आडगाव) हे कॅनडा कॉर्नरवरून काम आटोपून घरी जात असताना त्यांना रस्त्यात मित्र भेटले म्हणून सोनवणे यांनी दुचाकी थांबवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एका दुचाकीवर आलेल्या दोघा लुटारूंनी त्यांना धारधार कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी करत शिवीगाळ क रून खिशांची झडती घेत खिशातील सोन्याचे बिस्कीट व मोबाइल असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज हातोहात लंपास केला आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोशिरे मळा परिसरात सदर घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरवड्यापासून जुना गंगापूर नाक्यावरून पेठ रस्त्याला जोडणाऱ्या हनुमानवाडी-मखमलाबाद रिंगरोडसह हनुमानवाडी-रामवाडी रस्त्यावरही भरदिवसा व रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वारांना अडवून लुटमारीच्या घटना घडत आहेत. लुटमार करणारे चोरटे एकट्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून लक्ष्य करत असल्याच्या तक्रारी केल्या जात असतानाही लुटमार करणाऱ्या टोळीचा पोलिसांना छडा लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.