वऱ्हाडी सावधान! नियम मोडल्यास दंडाचे प्रावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:23+5:302021-06-09T04:17:23+5:30
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नोव्हेंबरपासून निर्बंध शिथिल झाले आणि त्यामुळेच लग्न सोहळे धूमधडाक्यात होऊ लागले. वऱ्हाडींच्या संख्येला मर्यादा असतानाही ...

वऱ्हाडी सावधान! नियम मोडल्यास दंडाचे प्रावधान
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नोव्हेंबरपासून निर्बंध शिथिल झाले आणि त्यामुळेच लग्न सोहळे धूमधडाक्यात होऊ लागले. वऱ्हाडींच्या संख्येला मर्यादा असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तेही एक कारण ठरले. त्यामुळे राज्य सरकारने ५ एप्रिलपासून निर्बंध घालून दिले असले तरी नाशिक शहरात १५ एप्रिलपासूनच लग्न सोहळा मंगल कार्यालयात करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर आता गेल्या सोमवारपासून निर्बंध शिथिल झाले असून, लग्न सोहळ्यासाठी पन्नास वऱ्हाडींनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी मर्यादेचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्तांनी आता लग्न सोहळ्यात निमयांचे उल्लंघन झाल्यास थेट दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे. लग्न सोहळ्यापूर्वी मंगल कार्यालयचालक, लॉन्सचालकांनी आपल्या भागातील पोलीस ठाणे आणि महापालिकेच्या विभागीय कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. यानंतर वऱ्हाडींची संख्या वाढल्यास आणि आरोग्य नियमांचे पालन न झाल्यास लॉन्स अथवा मंगल कार्यालयांना प्रत्येकी वीस हजार, तर वधू आणि वर पक्षालाही प्रत्येकी दहा, असा एकूण चाळीस हजार रुपयांचा दंड करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. याशिवाय मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांचा परवाना पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.
इन्फो..
दुकानदारांना पाच, तर ग्राहकाला एक हजाराचा दंड
आरोग्य नियमांचे आणि निर्बंधांचे पालन बंधनकारक असून, अत्यावश्यक दुकाने आणि अन्य दुकानेदेखील सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुपारी ४ वाजेपर्यंत खुली असली तरी आरोग्य नियमांचे पालन करण्याची गरज आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने आस्थापना सुरू ठेवल्यास दुकानदारांना पाच हजार रुपये, तर दुकानातील ग्राहकास एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.