दीडशे मुलांना श्रवणयंत्राचा लाभ

By Admin | Updated: February 7, 2017 23:00 IST2017-02-07T22:59:47+5:302017-02-07T23:00:18+5:30

राज्यातील पहिला उपक्रम : विद्यार्थ्यांशी संवाद

Benefits of hearing aids to hundreds of children | दीडशे मुलांना श्रवणयंत्राचा लाभ

दीडशे मुलांना श्रवणयंत्राचा लाभ

स्वप्निल जोशी : नाशिक
समाजातील दिव्यांग, शारीरिक व्यंग असणाऱ्यांसाठी विविध सामाजिक संस्थांद्वारे उपक्रम राबविले जातात. याच संस्थांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रचना विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘सेल बँक’ तयार केली आहे. या बँकेद्वारे आजमितीस सुमारे पावणे दोनशे विद्यार्थी संवाद साधत आहेत. जन्मत: कर्णबधिरता असलेल्या मुलांच्या संख्येचे प्रमाण वाढत चालले आहे. या मुलांच्या ज्ञानग्रहणात श्रवणयंत्र महत्त्वाची भूमिका बजावते. या यंत्राद्वारे कानावर पडणाऱ्या शब्दांमुळे संवाद साधण्यास मदत होते. या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तसेच श्रवणयंत्र सेलची किंमत आवाक्याबाहेर असल्याने विद्यार्थी श्रवणयंत्राचा वापर अगदी मोजकाच करतात. याचे प्रमुख कारण म्हणजे दोन ते तीन दिवसांत संपणारा सेल. केवळ शाळेपुरतेच वापरले जाणारे श्रवणयंत्र घरीही वापरता यावे व संवाद वाढावा यासाठी ‘रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाने’ एकत्र येत महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित ‘श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयातील’ कर्णबधिर विद्यार्थ्यांना माफक दरात हे सेल उपलब्ध करून दिले आहेत.  १०० विद्यार्थ्यांच्या श्रवणयंत्र सेलसाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च येतो. ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने माजी विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी दाते (डोनर) शोधले आणि बघता बघता दोन लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध केला. मुंबई येथील सेल बनविणाऱ्या कंपनीशी करार करून  ते मोठ्या संख्येने सेल विकत घेतात आणि निर्धारित किमतीपेक्षा माफक दरात हे सेल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयाप्रमाणेच जळगाव आणि मुंबई येथील शाळांनीदेखील माजी विद्यार्थी संघाशी संपर्क साधून हे सेल जळगाव आणि मुंबई येथे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. माजी विद्यार्थी संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रमदेखील राबविण्यात येतात. यापूर्वी संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शन, आरोग्य तपासणी, गिर्यारोहण असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. २०१४ साली स्थापन झालेल्या रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाची सदस्य संख्या एक हजार होऊन अधिक झाली असून, दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ते एकत्र येतात व विविध योजना राबविण्याच्या दृष्टीने एकमेकांशी हितगुज करतात. श्रवणयंत्र सेल बँकेतून विद्यार्थ्यांपाठोपाठ ज्येष्ठ नागरिकांनादेखील श्रवणयंत्र सेल देण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे.

Web Title: Benefits of hearing aids to hundreds of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.