सटाण्यातील ‘त्या’ पेटीत निघाली घंटा!
By Admin | Updated: September 27, 2016 00:42 IST2016-09-27T00:41:34+5:302016-09-27T00:42:05+5:30
खोदा पहाड, निकला चुहा : अखेर गूढ उकलले, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सटाण्यातील ‘त्या’ पेटीत निघाली घंटा!
नितीन बोरसे ल्ल सटाणा
स्थळ - सटाणा शहरातील भाक्षी रोडवरील एक निर्जन स्थळ.
वेळ - सायंकाळी ७ वाजेची.
उपस्थिती - दहशतवादविरोधी पथक.
रविवारी लष्कराचा शिक्का असलेली व संशयास्पदरीत्या सापडलेली पेटी भाक्षी रोडवरील निर्जन स्थळी एक छोटासा स्फोट करून उडविण्यात येते. त्यात नेमके काय असेल याबाबत दहशतवादविरोधी पथकासह पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्याही मनात उत्सुकतेने घर केलेले असते. पण जेव्हा त्या पेटीतून शस्त्रास्त्रे अथवा कोणताही ज्वालाग्राही पदार्थ न निघता जेव्हा तिच्यात घंटा आढळून आली, तेव्हा सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर मात्र परिसरात ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशाच प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते.
गेल्या शनिवारी सायंकाळी बागलाण तालुक्यातील किकवारी येथील नंदू काकुळते यांच्या शेतात भारतीय लष्कराचा शिक्का असलेली संशयास्पद पेटी विक्र ीसाठी आणली असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बशीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने रात्री छापा टाकून ही पेटी हस्तगत केली. दरम्यान, देवळाली कॅम्पच्या लष्करी अधिकाऱ्यांनी रविवारी या पेटीची तपासणी करून ती लष्करीची नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर बॉम्बशोधक पथक, श्वानपथक तसेच दहशतवादविरोधी पथक सटाण्यात दाखल झाले. त्यांनी वीस ते बावीस किलो वजन असलेल्या पेटीबाबत संशय व्यक्त केल्याने त्याबाबत संशयाचे गूढ वाढत असताना, सोमवारी सायंकाळी सात वाजता दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी ही पेटी उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भाक्षी रोडवरील एका निर्जन स्थळी पेटी नेण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने छोटासा स्फोट करून पेटी उडविण्यात आली. या पेटीत एक घंटा व थर्माकॉल निघाले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तणावाखाली असलेल्या यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला.
यावेळी सहायक पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते, पोलीस निरीक्षक बशीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, हे यंत्र
विक्रीचे कनेक्शन उजैनशी संबंधित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात बडे मासे गळाला लागून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पैशांचा पाऊस पाडण्यासाठीचे यंत्र असल्याची चर्चा
या प्रकरणी पोलिसांनी सटाणा, खमताणे, डांगसौंदाणे, मुंजवाड, किकवारी खुर्द येथील सहा जणांना ताब्यात घेतले. मात्र तीन जण फरार झाले. ताब्यात घेतलेल्या सहा जणांनी ही पेटी काही दिवसांपूर्वी डांगसौंदाणे येथील एका हॉटेलमध्ये ठेवली होती. त्याची चर्चा झाल्याने ती आठ दिवसांपूर्वी किकवारी येथील नंदू काकुळते यांच्या शेतात लपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ही पेटी सांभाळण्यासाठी संबंधितांना प्रत्येकी तीस ते चाळीस हजार रु पये महिना दिला जात असल्याचीही चर्चा आहे. श्वानपथक व बॉम्बशोधक पथकाने केलेल्या तपासणीत त्या पेटीबाबत संशय व्यक्त केल्याने पोलीस यंत्रणेत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र हे पैशांचा पाऊस व धन काढण्यसाठीचे यंत्र विक्र ी केले जात असल्याचा निर्ष्कश काढला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.