तिसऱ्या लाटेची घंटा कधीही वाजणार; तयारी सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:16+5:302021-07-19T04:11:16+5:30
(डमी) नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची घंटा कधीही वाजू शकणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका ...

तिसऱ्या लाटेची घंटा कधीही वाजणार; तयारी सुरूच!
(डमी)
नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची घंटा कधीही वाजू शकणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन साठा, गोळ्या, औषधे यांच्या सज्जतेवर भर दिला जात आहे. मात्र, तिसरी लाट येऊच नये यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न लसच कमी प्रमाणात मिळत असल्याने अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे.
तिसरी लाट कधी येणार, ती किती घातक असणार तसेच ती किती कालावधीसाठी टिकणार, याबाबत कुणालाच निश्चित सांगता येत नसल्याने त्याबाबत केवळ अंदाज वर्तविले जात आहेत. मात्र, त्यासाठीची आपली सज्जता वाढविण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेडची जाणवलेली उणीव निदान भविष्यात जाणवू नये यासाठी ऑक्सिजन प्रकल्पांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. बिटको रुग्णालयातच आरटीपीसीआर अहवालांसाठी स्वतंत्र लॅब सुरू करू शकल्याने काही प्रमाणात तरी अहवाल लवकर मिळू शकले. तसेच मनपाच्या व्हेंटिलेटरची संख्यादेखील ५८ वरून १२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सीटी स्कॅन मशीनदेखील बिटकोत सुरू करून लावण्यात आले असून कंत्राटी तत्त्वावर सुमारे ११०० कर्मचारीदेखील सज्ज ठेवण्यात आले आहेत.
इन्फो
३७ पैकी ५ ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण
जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा कमी पडू नये, यासाठी स्वतंत्र ३७ ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. आतापर्यंत त्यातील ५ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ३२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नाशिक मनपा क्षेत्रात दुसऱ्या लाटेपूर्वीच बिटको हॉस्पिटलला २० केएल क्षमतेचा आणि झाकीर हुसेनला १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक कार्यान्वित झाला आहे.
इन्फो
कोरोना सेंटरसह एकूण अतिरिक्त ३ हजार बेड
गत लाटेतील अनुभव लक्षात घेऊनच नाशिक महापालिकेने ऑक्सिजन बेड वाढविण्यावर भर दिला आहे. नाशिक महापालिकेकडून बालकांसाठी दोन स्वतंत्र रुग्णालय उभारणीसह दुसऱ्या लाटेच्या तुलनेत एकूण १५०० ऑक्सिजन बेड वाढविण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. त्यात ठक्कर डोमचे सर्व ३२५ बेड, बिटकोचे ३५० बेड ६५० केले, संभाजी स्टेडियमचे २०० बेड तसेच अंबडच्या आयटी पार्क इमारतीत ५०० बेडसह एकूण दीड हजार ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार आहेत. त्याशिवाय जिल्हा रुग्णालयात ५० तर अन्य ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ३०० ऑक्सिजन बेड वाढविण्यात आले आहेत. तसेच जिल्हाभरातील बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स बनविण्यात आला. खासगी बाल रुग्णालयांतील एक हजाराहून अधिक ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
इन्फो
तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेच्यावतीने तयारीला वेग देण्यात आला आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व कामांची पूर्तता होईल, याप्रकारे नियोजन आखण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत किमान ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजन साठ्याची कमतरता तरी जाणवू नये, अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मनपा आरोग्य अधिकारी
-----------------