अवघा एक धोकादायक वृक्ष तोडण्यास मान्यता
By Admin | Updated: July 20, 2016 00:50 IST2016-07-20T00:14:35+5:302016-07-20T00:50:19+5:30
वृक्षप्राधिकरण समिती : ४७ वृक्षांबाबत परवानगी नाकारली

अवघा एक धोकादायक वृक्ष तोडण्यास मान्यता
नाशिक : गेल्या शनिवारी (दि.१६) महात्मा गांधी रोडवरील वकीलवाडीत कडुनिंबाचा जुना वृक्ष कोसळून तिघे गंभीर झाल्याच्या घटनेनंतर शहरातील धोकेदायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत १७ पैकी अवघा एक धोकादायक वृक्ष तोडण्यास मान्यता देण्यात आली. उर्वरित वृक्षांची पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय शहरातील १७६ वृक्षांचा विस्तार कमी करण्यास मान्यता देतानाच ४७ वृक्षांचा विस्तार करण्यास मात्र परवानगी नाकारण्यात आली.
महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीची बैठक आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रा. कुणाल वाघ आणि अरविंद शेळके हे अवघे दोन सदस्य उपस्थित होते. उद्यान विभागाकडे शहरातील विविध विभागांतील धोकेदायक झाडे तोडण्यासंबंधीचे ५८ प्रस्ताव मान्यतेसाठी आले होते. त्यातील १७ झाडे तातडीने तोडण्याची गरज असल्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीपुढे ठेवण्यात आला होता. यावेळी अवघे एक धोकादायक झाड तोडण्यास मान्यता देण्यात आली, तर अन्य झाडांची उद्यान अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक यांनी पाहणी करून तसा प्रस्ताव ठेवण्याचे आदेशित करण्यात आले.