बेलगाव कुऱ्हेला मजुराचा खून
By Admin | Updated: April 29, 2017 02:42 IST2017-04-29T02:42:19+5:302017-04-29T02:42:28+5:30
बेलगाव कुऱ्हे : भाजी बनवण्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेल्याने मजुराचा त्याच्याच मित्रांनी लाकडी दांड्याने खून केल्याची घटना घडली.

बेलगाव कुऱ्हेला मजुराचा खून
बेलगाव कुऱ्हे : भाजी बनवण्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेल्याने विहीर खोदकाम करणाऱ्या मजुराचा त्याच्याच मित्रांनी लाकडी दांड्याने खून केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशनलगतच्या जानोरी शिवारात घडली.
संजय (आडनाव माहीत नाही) असे या दुर्दैवी मृत मजुराचे नाव आहे. याबाबत धोंडीराम गुंजाळ यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित योगेश व सुरेश रा. पंचवटी, नाशिक यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते फरार आहेत. जानोरी शिवारात बाळू शिनगार यांची विहीर खोदण्याचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. हे काम धामणगाव येथील धोंडीराम गुंजाळ यांनी घेतले आहे. या कामासाठी नाशिक येथून काही मजूर रोजंदारीने आणले. बुधवारी अमावास्या असल्याने काम बंद होते. त्या दिवशी गुंजाळ यांनी मजुरांचा पगार अदा केला. पगार झाल्यामुळे काही मजूर घरी परतले तर सुरेश, संजय व योगेश हे कामाच्या ठिकाणीच थांबले. रात्री जेवणावरून त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. दुसऱ्या दिवशी गुंजाळ यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी संशयितांना मजुराचा खून केल्याचे लक्षात आल्यानंतर गुंजाळ यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रसंग कथन केला. उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक, सोनवणे आदींनी पंचनामा केला. संजयच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडीसळी, लाकडी दांडा, दगड, चप्पल आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)