खालपच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे
By Admin | Updated: August 26, 2016 21:56 IST2016-08-26T21:55:53+5:302016-08-26T21:56:11+5:30
खालपच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे

खालपच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे
देवळा : तालुक्यातील खालप येथील शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून नुकसानभरपाईसाठी देवळा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण देवळा तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या लेखी पत्रानंतर मागे घेतले आहे. मात्र आपण समाधानी नसून आपली लढाई पुढे सुरूच राहील, असे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
खालप येथील यादव सूर्यवंशी यांच्या कांदा चाळीस ११ मार्च रोजी आग लागून त्यात शेती औजारे व एक बैल मृत्युमुखी पडला होता. महसूल विभागाकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने संबंधित यादव सूर्यवंशी, जिभाऊ सूर्यवंशी, कौतिक सूर्यवंशी व धनाजी सूर्यवंशी ह्या चार शेतकऱ्यांनी सोमवारपासून(दि. २२) देवळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. याबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून तत्काळ २५ हजार रुपयांचा धनादेश कृषी सभापती केदा अहेर यांनी दिला होता. मात्र संबंधित शेतकऱ्याला दुष्काळी परिस्थितीत नुकसान मोठे झाले असल्यामुळे महसूल विभागाने योग्य निकष लावून शासन दरबारी अहवाल पाठवावा व आपणास शासकीय मदत मिळावी ही मागणी देवळा तहसीलदारांकडे केली.
मात्र संबंधित शेतकऱ्यावर अन्याय झाला असून, अशा पत्रकांचा निषेध संतोष सूर्यवंशी, नानाजी सूर्यवंशी यांनी केला आहे. यावेळी कपिल सूर्यवंशी, नानाजी सूर्यवंशी, बारकू सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, दिनेश जाधव, दादाजी सोनवणे, बाळू सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी, सुरेश आहेर आदिंसह खालप येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)