आश्वासनानंतर बिंदूजी महाराज यांचे उपोषण मागे
By Admin | Updated: August 18, 2016 01:57 IST2016-08-18T01:56:20+5:302016-08-18T01:57:34+5:30
दहा दिवसात लेखी माहिती : विश्वस्त मंडळाची अनुपस्थिती

आश्वासनानंतर बिंदूजी महाराज यांचे उपोषण मागे
त्र्यंबकेश्वर : माहितीचा अधिकार कायद्यान्वये माहिती देण्याची विनंती, त्यानंतर अपिलाचा अर्ज देऊनही हवी तशी माहिती मिळू न शकल्याने १५ आॅगस्ट रोजी उपोषणास बसलेले डॉॅ. बिंदूजी महाराज यांनी तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.
उपोषणासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर व्यासपीठ तयार केले होते. तथापि काही तासातच तहसीलदार नरेशकुमार बहिरम उपोषणस्थळी पोहोचले. त्यांनी देवस्थान अध्यक्ष असलेल्या न्या. जोशी-फलके यांच्याशी संपर्क साधून उपोषण सोडण्याची विनंती केली.
लेखी आश्वासनाशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा बिंदू महाराजांनी घेतला. येत्या १० दिवसात आपणाला लेखी माहिती मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतर तहसीलदारांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन त्यांनी उपोषण सोडले.
यावेळी स्वामी सागरानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती (भगवानबाबा), गणेशानंद सरस्वती, भाजपाचे शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र देवस्थानतर्फे मुखय कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी, मुख्य प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य उपस्थित होते. मात्र यावेळी विश्वस्तांपैकी कोणीही फिरकले नाही.
उपोषण सोडण्यासाठी पो.नि. मुकुंद देशमुख, श्यामराव गंगापुत्र, तहसीलदार नरेश्कुमार बहिरम यांनी पुढाकार घेऊन बिंदूजी महाराज यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. (वार्ताहर)