गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेला सुरुवात
By Admin | Updated: February 14, 2015 00:18 IST2015-02-14T00:18:02+5:302015-02-14T00:18:02+5:30
साने गुरुजी कथामाला : औरंगाबादकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन

गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेला सुरुवात
नाशिक : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व शालेय जीवनातच त्यांच्यातील अभिनयाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन साने गुरुजी कथामालेअंतर्गत आयोजित केलेल्या रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य या तीनदिवसीय स्पर्धेेला सुरुवात झाली असून, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, बालभवन विभागाचे प्रमुख गिरीश नातू, संतोष गुजराथी, हितेंद्र नाईक, मीना वाघ, बालभवनच्या समिती सदस्य डॉ. आशा कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. एकूण १५ शाळा व संस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १००१, ५०१ व ३०१ रुपये व स्मृतिचिन्ह बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.
नाट्यस्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुनंदा केले विद्यालयाने ‘शक्ती की युक्ती’, स्वामिनारायण इंग्रजी माध्यम शाळेने ‘आजी कुठे दिसत नाही’, पुरुषोत्तम इंग्रजी माध्यम शाळेने ‘येरे येरे पावसा’, रुंग्टा हायस्कूलने ‘आॅफ पिरियड’ या नाटकांचे सादरीकरण केले. यातील ‘आॅफ पिरियड’ या नाटकाच्या माध्यमातून रुंग्टा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आॅफ पिरियडमध्ये विद्यार्थी काय काय चर्चा करतात, हे दाखविण्यात आले. देशाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकून देशाचे नागरिकच येथील परिस्थितीस जबाबदार असल्याचे या नाटकातून दर्शविण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या काळ्या कर्तृत्वाचे चित्र उभारून आजची पिढी प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया याच्या आहारी गेल्याने देशाची अधोगती होते आहे. त्यामुळे याचा अतिवापर टाळणेच योग्य असल्याचा संदेश यातून देण्यात आला.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देत त्यांच्या पावलावर पाऊल टाकल्यास आपल्या देशाचा नक्कीच विकास होईल, असा विश्वासही या नाटकातून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, हितेंद्र नाईक व मीना
वाघ यांनी परीक्षकांची भूमिका बजावली. (प्रतिनिधी)