ंनाशकातून डिफेन्स क्लस्टरची सुरुवात
By Admin | Updated: July 3, 2017 00:28 IST2017-07-03T00:28:33+5:302017-07-03T00:28:51+5:30
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’च्या मोहिमेअंतर्गत संरक्षण साहित्य उत्पादनावर भर दिला आहे.

ंनाशकातून डिफेन्स क्लस्टरची सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारत अजूनही संरक्षण क्षेत्रात आयातीवर विसंबून असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’च्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत संरक्षण साहित्य उत्पादनावर भर दिला असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पाच ठिकाणांची निवड या संरक्षण साहित्य निर्मिती व त्यांच्या पूरक उद्योगांसाठी करण्यात आली आहे. या डिफेन्स क्लस्टरची सुरुवात नाशिकपासूनच करण्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरतर्फे आयोजित नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष मंडलेचा यांचा रविवारी (दि.२) नागरी सत्कार सोहळा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. व्यासपीठावर, बोस्टन एमआयटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रमेश रासकर, आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे तसेचमहापौर रंजना भानसी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, अमित कामत, अनिलकुमार लोढा आदी उपस्थित होते. सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मंडलेचा यांनी डिफेन्स क्लस्टरची सुरुवात नाशिकपासून व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर बोलताना डॉ. सुभाष भामरे यांनी क्लस्टरची सुरुवात नाशिकपासूनच करण्याचे आश्वासन देताना यासाठी उद्योजकांचाही सहभाग अपेक्षित असल्याचे सांगितले. ते म्हणाले, १९६२च्या युद्धात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर देशांतर्गत शस्त्रास्त्रनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. परंतु, विकसित तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या अभावामुळे आपण शस्त्रास्त्र निर्मितीत मागे पडलो. त्यामुळे संरक्षण साहित्यासाठी आयातीवर निर्भर राहावे लागत होते. परंतु आता परिस्थिती बदलत असून, भारत शस्त्रास्त्रांची निर्यात करीत असून, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात तसेच खासगी उद्योगांच्या मदतीने ‘एफ-१६’ सारख्या लढावू विमानांची निर्मिती देशात सुरू होणार आहे.