मालेगाव : महापालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. भ्रष्टाचार, गुंडगिरी, प्रशासनावरील दबाव वाढविण्याचा प्रकार सर्रास होताना घडामोडीवरुन दिसून येत आहे.शहराच्या पूर्व भागात राष्ट्रवादी कॉँग्रेस - जनता दल, कॉँग्रेस, एमआयएम व इतर पक्षांमध्ये समोरा-समोर लढत होत आहे. महानगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. एमआयएमचे खासदार असदउद्दीन ओवेसी यांच्या सभेनंतर शहराच्या पूर्व भागातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनता दलाने गेल्या दोन महिन्यांपासून शहराच्या पूर्व भागात जनसंपर्क व दांडग्या प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे एमआयएमच्या गोटातही शांतता पसरली होती. मात्र खासदार ओवेसी यांच्या सभेनंतर एमआयएमच्या स्थानिक नेत्यांना बळ मिळाले आहे. ओवेसी यांनी मालेगावी पुन्हा दोन सभा घेण्याचे आश्वासन एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे ओवेसींची पुन्हा सभा होण्याची शक्यता आहे.कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस- जनता दल यांच्यापुढे एमआयएम आव्हान उभे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचे प्रकारही वाढले आहेत. शुक्रवारी रात्री एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यानंतर येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारात मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. पवारवाडी व शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यावरून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकारही घडला. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी गेल्या महिनाभरापूर्वी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या मुसक्या आवळल्या होत्या. विद्यमान पाच नगरसेवकांना तडीपारीचा रस्ता दाखविला होता. पोलीस प्रशासनाने चांगला वचक निर्माण केला असताना राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार घडत आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकमेकांवर गुंडगिरी व भ्रष्टाचाराचे उघड-उघड आरोप करीत असल्यामुळे शीतयुद्ध सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये शीतयुद्धाला सुरुवात
By admin | Updated: April 30, 2017 01:21 IST