अष्टभुजा देवी यात्रेस प्रारंभ
By Admin | Updated: January 14, 2017 00:25 IST2017-01-14T00:25:22+5:302017-01-14T00:25:34+5:30
पाळे खुर्द : महाआरती, होमहवन आदिंसह कुस्त्यांची दंगल

अष्टभुजा देवी यात्रेस प्रारंभ
पाळे खुर्द : येथील जागृत देवस्थान श्री अष्टभुजा देवीच्या यात्रोत्सवास गुरुवारपासून (दि. १२) प्रारंभ झाला. पौष पौर्णिमेनिमित्त पुजारी सुनील पाठक यांच्या हस्ते कलशपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्र म झाला. देवीच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. महाआरती, होमहवन आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल होणार आहे, तर शनिवारी (दि. १४) भंडाऱ्याने कार्यक्र माची सांगता होईल. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात पथदीप तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपसरप्ांच महेंद्र पाटील, संजय पाटील, पोलीसपाटील अशोक मोतीराम पाटील यांनी दिली. यात्रा कमिटीत अध्यक्ष- संजय राजाराम पाटील, उपाध्यक्ष- वैभव चंद्रकांत पाटील, खजिनदार- विशाल रामदास देवरे, सचिव- संदीप हरिभाऊ पाटील, कार्यकारिणी सदस्य- नीलेश अभिमन्यू पाटील, हेमंत पाटील, दीपक गांगुर्डे, अनिल पाटील, सचिन पाटील, महेंद्र भास्कर पाटील, सुनील पाटील, अमित देवरे, गुलाब पाटील, महेंद्र पाटील, वैभव पाटील, किरण पाटील यांचा समावेश आहे.
सुरतेहून येताना शिवाजी महाराजांना घनदाट जंगलात आज ज्या ठिकाणी अष्टभुजा देवीचे मंदिर आहे तेथे एक आदिवासी जोडपे दिसले. गिरणा नदीच्या तीरावर पर्णकुटी करून ते राहत होते व उदरनिर्वाहसाठी शेजारील कसबे पाताळेश्वर (ज्या ठिकाणी आजही महाराजांची गढी आहे) त्या ठिकाणी जात.
महाराजांनी आदिवासी महिलेला प्रश्न केला, ‘माते मला ओळखलं का?’ त्यावर त्या महिलेने उत्तर दिले, ‘पोशाखावरून आपण कुणी तरी मोठे राजे-महाराजे दिसतात.’ त्यावर महाराजांनी स्मितहास्य करून ‘छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखते का?’ असे विचारले. त्या आदिवासी महिलेने महाराजांना पळसवृक्षाच्या पानावर गोलाकार पद्धतीने भात व त्यामध्ये कढी व त्यावर कढीपत्ता असलेली फांदी शिजवून ठेवलेली होती व बाजूला चटणी होती. त्यावर महाराजांनी महिलेला विचारले, ‘हे काय भोजन आहे?’ त्यावर महिला उत्तरली, ‘कढीची पाळ गोलाकार पद्धतीने भात भिजवून मग सेवन करावयाचे.’ तेथेच महाराजांना गनिमी काव्याची कल्पना सुचली. असेच आपण शत्रूच्या किल्ल्याला गोलाकार वेढा मारला तर आपल्याला किल्ला सहज जिंकता येईल. या कल्पनेने कढीची पाळ व पाळ शब्द जास्त स्मरणात राहिल्याने पाताळेश्वर गावाचे नामकरण महाराजांनी पाळे असे केले. दुसऱ्या दिवशी गिरणा नदीपात्रात स्नान करून तुळजाभवानीची पूजा केली. श्री अष्टभुजा देवीची स्थापना केली. तो दिवस होता मराठी महिन्यातील पौष पौर्णिमेचा. तेव्हापासून पाळे खुर्द गावात यात्रोत्सव साजरा केला जातो. (वार्ताहर)