पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे मतमोजणीप्रकिया शांततेत
By Admin | Updated: May 17, 2014 00:34 IST2014-05-17T00:01:20+5:302014-05-17T00:34:14+5:30
शहरात शांततामय वातावरण : अनुचित घटना नाही

पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे मतमोजणीप्रकिया शांततेत
शहरात शांततामय वातावरण : अनुचित घटना नाही
नाशिक : पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केलेल्या यशस्वी पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनामुळे लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली़ या प्रक्रियेनंतर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़
अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी झाली़ या दोन्ही मतदारसंघांत झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमुळे मतदारांमध्ये निकालाबाबत कमालीची उत्सुकता होती़ त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्या होणार्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी एक दिवस अगोदरपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़
मतमोजणीदरम्यान उमेदवारांच्या मतांच्या आघाडी-पिछाडीदरम्यान विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक राजकीय पक्षाच्या वाहनासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था तसेच त्यांना उभे राहण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली होती़ मतमोजणीच्या ठिकाणी ओळखपत्रधारकाव्यतिरिक्त कोणीही जाणार नाही, याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेतली़
लोकसभा मतदानाच्या दिवशी झालेले पोलीस कर्मचार्यांचे हाल मतमोजणीच्या दिवशी मात्र झाले नाही़ सेंट्रल वेअर हाऊसच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, बॅरेकेडिंग तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तंबूची उभारणी करण्यात आली होती़ पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त डॉ़ डी़एस़ स्वामी, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, हेमराजसिंह राजपूत हे मतमोजणीच्या ठिकाणी ठाण मांडून होते़
शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी शहरातील पक्षांची कार्यालये तसेच रस्त्यांवर चांगला बंदोबस्त तैनात केला होता़ त्यामुळे शहरात कुठेही अनुचित घटना घडली नाही़ दरम्यान, मतमोजणीप्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडल्याने पोलीस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़
१८ मेनंतर विजयी मिरवणुका
लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांना विजयी मिरवणूक काढावयाची असल्यास दोन दिवस वाट पहावी लागणार आहे़ १८ मेनंतर मिरवणुकीला परवानगी दिली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली़