सुशोभिकरण अडकले ‘हद्दीच्या’ वादात
By Admin | Updated: November 9, 2015 23:54 IST2015-11-09T23:53:25+5:302015-11-09T23:54:29+5:30
गोवर्धन : अधिकारी-लोकप्रतिनिधींना नोटिसा

सुशोभिकरण अडकले ‘हद्दीच्या’ वादात
नाशिक : खासगीकरणाच्या (बीओटी) माध्यमातून राज्यात व देशात अनेक विकासकामे साकारत असतानाच नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या हद्दीच्या वादातून गंगापूर रस्त्यावरील वाहतूक बेट सुशोभिकरण अडकल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे महापालिकेने संबंधित रस्त्यावरील वाहतूक बेट व रस्ता दुभाजक विकसित करून सुशोभिकरण करण्यासाठी एका वाइन कंपनीशी करार केल्याने संबंधित कंपनीने याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह महापालिकेच्या अधिकार्यांना, तसेच गोवर्धन ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावल्याचे समजते.
सोमा वाइन यार्ड्स या कंपनीने महापालिकेच्या वाहतूक कार्यकारी अभियंत्यासमवेत काही अटी-शर्तीनुसार करारनामा केला. त्यानुसार नाशिक शहरातील गंगापूर रस्त्यावरील महापालिकेच्या रस्त्यावरील चॅनलायझर व रस्ता दुभाजक विकसित करून सुशोभिकरण व दुरुस्ती देखभालसंदर्भात करार केला आहे. त्यानुसार रस्ता व वाहतूक बेट सुशोभिकरणाचे कामही सुरू केले होते. मात्र १६ ऑक्टोबर २0१५ रोजी गोवर्धन ग्रामपंचायत सरपंच मीनाताई बाळू गभाले व ग्रामविकास अधिकारी पांडुरंग ठोके यांनी संबंधित वाइन कंपनीच्या व्यवस्थापकास पत्र पाठवून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हे काम ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी न घेतल्याने तत्काळ बंद करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर या वाइन कंपनीच्या संचालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची भेट घेऊन त्यांना महापालिकेचा करारनामा, तसेच अन्य कागदपत्रे सादर केली. त्यानुसार सुखदेव बनकर यांनी गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांना सूचना दिल्या. परदेशी यांनी गोवर्धन ग्रामपंचायतीला सूचना देत रस्ता विकसित करण्यासह वाहतूक बेट सुशोभिकरणाबाबत आडकाठी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तूर्तास हे सुशोभिकरण महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या हद्दीच्या वादात रखडल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)