सावधान ! नवरात्रात गुंड सक्रिय

By Admin | Updated: October 18, 2015 22:08 IST2015-10-18T22:05:48+5:302015-10-18T22:08:25+5:30

ठिकठिकाणी गुन्हेगारी घटना : महिला, मुलींची छेडछाड, गर्दीत दहशत पसरविण्याचे उद्योग

Be careful! In Navaratri, the goons are active | सावधान ! नवरात्रात गुंड सक्रिय

सावधान ! नवरात्रात गुंड सक्रिय

नाशिक : शहरात नवरात्रोत्सवाची धूम सुरू असताना गुंडांच्यादेखील हालचाली वाढल्या आहेत. सार्वजनिक उत्सवाचे वातावरण बिघडविण्यासाठी शहरातील टवाळखोरांच्या गॅँग सक्रिय झाल्या असून. यामुळे शहरातील शांतता धोक्यात आली आहे. पोलिसांनाही गुंड जुमानत नसल्याने नवरात्रोत्सव धोक्यात आला आहे.
राजकीय वर्चस्ववाद आणि दहशत पसरविण्यासाठी शहरात गल्लोगल्ली गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. कुणाचीही तमा न बाळगणाऱ्या या टवाळांमुळे सर्वाधिक धोका महिला आणि मुलींना निर्माण झाला असून, शाळा, कॉलेज आणि क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी दररोजी अग्निपरीक्षाच असते. आता तर नवरात्रोत्सव असल्याने दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या मुलींची छेड काढण्यासाठी हे गुंड नवरात्रोत्सवाच्या भोवती फिरत असतात. या छेडछाडीतून कधी हाणामारीचे तर कधी दहशतीचे वातावरण पसरते. महिला-मुलींची छेड काढणे, एखाद्या तरुणाला घेरून त्यास मारहाण करणे, दांडियाच्या ठिकाणी सुसाट वेगाने दुचाकी चालविणे, उगाचच हॉर्न वाजविणे, जोरात आरोळी ठोकून उगाचच लक्ष वेधून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. दांडिया खेळणार आणि पाहण्यासाठी आलेल्यांनाही यामुळे असुरक्षित वाटू लागले आहे. वास्तविक नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी टवाळखोर शिरणारच नाही किंवा शांतता भंग करणाऱ्यांना लागलीच वठणीवर आणण्यासाठी पोलीस तसेच संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. पुढाऱ्यांनीदेखील त्यांच्या कार्यकर्त्यांना ‘होश’मध्ये राहण्याच्या सूचना देऊन शांतता प्रस्थापित कशी होईल याची काळजी घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी धुडगूस

नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी मद्यपी धुडगूस घालत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. सिडकोत दोन दिवसांपूर्वी मद्यपींनी धिंगाणा घातला होता. शनिवारी जेलरोड येथील दुर्गामाता मंदिरासमोर एका मद्यपीने रस्त्यातच चारचाकी उभी करून ट्रॅफिक अडवून धरली होती. पंचवटीतील क्रांतिनगर येथेही मद्यपींकडून दांडिया खेळणार्‍यांना त्रास दिला जात आहे. राणेनगर, सोमेश्‍वर कॉलनी, इंदिरानगर, पाइपलाइन रोड येथे टवाळांचा उपद्रव वाढला आहे.


मुलगा पळविण्याचा प्रयत्न?  

 जेलरोडवरील नारायणबापू नगर चौकात मुलगा पळविण्याचा कथित प्रकार घडला. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक इसम एका नऊ ते दहा वर्षांच्या मुलाला हाताला धरून ओढत असताना तो मुलगा जोरात ओरडत होता. ही बाब चौकात बसलेल्या काही तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी त्या इसमाला याबाबत विचारणा केली असता तो थोडासा गडबला. ही संधी साधून तो मुलगा त्याचा हात सोडून पळाला आणि पुढे उभे असलेल्या पोलिसांना ही बाब सांगितली. तो इसमही तरुणांच्या हातून निसटला आणि पळत सुटला. त्याच्या मागे पोलीस दुचाकीवरून लागले. तरुणही त्या इसमाच्या मागे लागले आणि अखेर त्यास पकडले. पोलीस पोहोचेपर्यंत तरुणांनी त्या इसमाचा चांगलाच समाचार घेतला होता. नंतर पोलीस त्यास पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ही घटना परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. प्रत्येकाला आपल्या मुलांची चिंता आता वाटत असून, पालक आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून आहेत. नवरात्रोत्सवात गावगुंडांचा उपद्रव असताना आता मुले पळविण्याचे प्रकार घडत आहे का? या प्रश्नाने नागरिक चिंतित झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी उपनगर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर प्रकरण रात्रीचे असल्याने दिवसपाळीतील कर्मचार्‍यांना काहीच माहिती नसल्याचे नेहमीचे उत्तर पोलिसांनी दिले.

Web Title: Be careful! In Navaratri, the goons are active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.