सावधान ! दिवाळीच्या मिठाईत भेसळ
By Admin | Updated: October 25, 2016 01:04 IST2016-10-25T01:03:15+5:302016-10-25T01:04:30+5:30
गोड विष : चांदीचा वर्खआणि खवाही बनावट; निकृष्ट दर्जाच्या खव्याची आवक

सावधान ! दिवाळीच्या मिठाईत भेसळ
नाशिक : दिवाळीत मिठाई खरेदी करीत असाल तर नाशिककरांनो सावधान ! कारण मिठाईमध्ये प्रमाणाबाहेर भेसळ होत असल्याची बाब समोर आली आहे. दिवाळीत मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते ही बाब हेरून भेसळ माफिया भेसळयुक्त मिठाई बनवित आहेत. आरोग्यला घातक ठरू शकणारी मिठाई बाजारात आल्याने नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. दिवाळीतील मागणीचा विचार करून मोठ्या प्रमाणात मिठाई बनविली जात असतानाच त्यासाठी बनावट तसेच निकृष्ठ दर्जाचा मावा वापरला जात आहे. विशेष म्हणजे हा मावा शेजारील गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये दाखल होत आहे. ही भेसळ सहजा सहजी ओळखता येत नसली तरी नागरिकांना संभाव्य धोका लक्षात घेत खात्रीशीर स्विट््सच्या दुकानातूच मिठाई खरेदी करावी लागणार आहे. मिठाईच्या क्षेत्रात नामवंत असलेल्या दुकानदारांकडूनही मिठाई घेतल्यास धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूकता दाखविणे हाच उपाय ठरू शकतो. दिवाळीची मिठाई बनविताना दूषित आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जातोच शिवाय मिठाई बनविणारे कारागीर आणि त्यांचे किचन अत्यंत गलिच्छ असल्याने दूषित मिठाईचा धोका अधिकच वाढतो. विशेषत: परप्रांतीय व्यावसायिकांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, त्यांच्या मिठाईचा दर्जा निकृष्ट असल्याची बाब यापूर्वीही अनेकदा समोर आलेली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या दुकानदारांकडे अन्य राज्यांमधून मावा, वनस्पती तूप, बर्फी मागविली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने आता धाडसत्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत या विभागाने ८५ नमुने ताब्यात घेतले आहेत शिवाय विभागात १२ ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. दिवाळीत मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात असते. याचा फायदा घेत विक्रेता मालामध्ये भेसळ करतात. त्यातून विषबाधेसारखे प्रकार घडण्याची शक्यता असते. मिठाई कशी वापरावी ४मिठाईपासून निर्माण झालेला धोका लक्षात घेता मिठाई कितीतास चांगली राहू शकते याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडूनच ग्राहकांना सजग करण्यात येत आहे. शक्यतो ग्राहकांनी मिठाई खरेदी केल्यानंतर २४ तासांतच मिठाई संपविली पाहिजे, तर बंगाली व तत्सम मिठाई असेल तर मिठाई खरेदी केल्यापासून ८ ते १० तास मिठाई चांगली राहू शकते. मिठाई खराब झालेली असेल तर ती तत्काळ नष्ट केली जावी. त्याबरोबरच खाद्यतेल, वनस्पती तूप, तूप हे पदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल ‘बेस्ट बिफोर..’ उत्पादन दिनांक पाहूनच खरेदी करावी, असे कळविण्यात आले आहे. मिठाई तसेच अन्न पदार्थ खरेदी करताना काही शंका आल्यास ग्राहकांनी सहआयुक्त (नाशिक) अन्न व औषध प्रशासन विभाग, उद्योग भवन, आयटीआय सिग्नलजवळ येथे संपर्क साधावा, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.