वाकी खापरी धरणातून पाण्याचा बेसुमार
By Admin | Updated: January 14, 2017 00:10 IST2017-01-14T00:10:13+5:302017-01-14T00:10:25+5:30
विसर्गपाणी सोडणे न थांबवल्यास तीव्र आंदोलन

वाकी खापरी धरणातून पाण्याचा बेसुमार
घोटी : नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणातून गेल्या महिन्यापासून दारणा धरणात सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामपंचायतींच्या वतीने वाकी खापरी धरणाचे सहायक अभियंता हरिभाऊ गीते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परिसरातील अनेक गावांची शेती व्यवसायाची मदार या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच धरणातून कोणतेही ठोस कारण नसताना पाणी सोडले जात असून, धरण रिकामे होत आहे. सोडण्यात येणारे पाणी जलद वेगाने जात आहे. पाण्याचा विसर्ग तत्काळ ंबंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी नव्याने झालेले यावर्षी काम पूर्णत्वाकडे असल्याने पूर्ण क्षमतेने भरले. सध्या धरणात ८०० दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.या धरणाच्या अनेक दरवाज्यांतून दारणा धरणात गेल्या महिन्यापासून पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडल्यामुळे या भागातील कुर्णोली, वाकी, कोरपगाव, भावली, पिंपळगाव भटाटा, वाळविहीर आदि गावांतील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. असेच चालू राहिले तर ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरण रिकामे होण्याची भीतीने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत असणाऱ्या या धरणातून कारण नसताना पाणी सोडले जात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. पाणी सोडण्याचे तत्काळ न थांबवल्यास कुठल्याही क्षणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. (वार्ताहर)