सिलिंडर वाहतूक वाहनांवर वजन काटे
By Admin | Updated: October 21, 2015 23:54 IST2015-10-21T23:53:51+5:302015-10-21T23:54:49+5:30
ग्राहक संरक्षण परिषद : तक्रारींचा वर्षाव

सिलिंडर वाहतूक वाहनांवर वजन काटे
नाशिक : गॅस सिलिंडरच्या वजनात तफावत आढळल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत सिलिंडर वाहतूक करणार्या वाहनांवर यापुढे वजन काटे ठेवण्याच्या सूचना ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी दिले आहेत.
बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत परिषदेच्या सदस्यांकडून ग्राहकांच्या हिताकडे होणार्या दुर्लक्षाच्या तक्रारींचा वर्षाव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने सिलिंडरच्या वजनात तफावत, रिक्षाचालकांकडून मीटरप्रमाणे न होणारी भाडे आकारणी, छापील किमतीपेक्षाही अधिक किमतीने होणारी बाटली बंद पाण्याची विक्री, आर्थिक डबघाईस गेलेल्या पतसंस्था, बॅँकांच्या ठेवीदारांची परतफेड, वीज बिलाची वाढीव आकारणी अशा विविध तक्रारी करण्यात आल्या. त्यावर प्रत्येक तक्रारनिहाय उपाययोजनांचा निर्णय घेण्यात आला. गॅस एजन्सीचालकांनी गॅस सिलिंडरचे वितरण करताना प्रत्येक ग्राहकाला त्याचे वजन करून देण्याचे व त्यासाठी सिलिंडरची वाहतूक करणार्या वाहनांवर वजन काटे ठेवण्याची सूचना करण्यात आली. गॅस ग्राहकाचे त्यामुळे समाधान होऊन तक्रारींना आळा बसेलच; परंतु गॅस चोरीच्या घटनाही टाळणे सुलभ होणार असल्याचे सांगण्यात आले. बाटलीबंद पाण्याची वाढीव दराने विक्री करणार्या ठिकाणांवर वजन माप विभागाच्या अधिकार्यांनी खात्री करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रिक्षा थांब्यावर भाडे आकारणीचे दरपत्रक लावण्यात यावे, रेशन दुकाने वेळेवर उघडावीत यासाठी दुकानदारांना समज देण्याचे ठरविण्यात आले. ग्राहक हिताला बाधा आणणार्या प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या चाकोरीत बसवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीकडे खाते प्रमुख असलेले जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदि अधिकार्यांनी पाठ फिरविली.