कांदे यांच्याविरोधात खंडणीसह अपहरणाचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 4, 2017 02:41 IST2017-04-04T02:41:11+5:302017-04-04T02:41:24+5:30
नाशिक : एकाचे अपहरण तसेच खंडणी वसुली केल्याप्रकरणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संशयित सुहास कांदे व त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

कांदे यांच्याविरोधात खंडणीसह अपहरणाचा गुन्हा दाखल
नाशिक : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी धमकी देऊन एकाचे अपहरण तसेच खंडणी वसुली केल्याप्रकरणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संशयित सुहास कांदे व त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ या संशयितांपैकी विलास हिरे या एका संशयितास अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयाने ६ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कांदे हे मुंबईत असल्याने त्यांच्या मागावर एक पथक मुंबईस रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
गंगापूर पोलीस ठाण्यात उमा जाखडी (रा़ अॅम्बीयन्स अॅव्हेन्यू, सुयोग कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती अजय जाखडी हे प्रॉपर्टी एजंट म्हणून काम करतात़ कॉलेजरोड येथील रोहन हिरे व प्रशांत अहेर यांची बांधकाम व्यवसायात पार्टनरशिप आहे़ जाखडी यांनी या दोघांना काही वर्षांपूर्वी रोख रक्कम दिली होती़ मात्र ही रक्कम त्यांनी वेळेवर परत न केल्याने त्यांच्या सुरू असलेल्या इमारतीतील एका फ्लॅटचे साठेखत लिहून घेण्यात आले होते़ मात्र, या फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने जाखडी यांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याने रोहन हिरे विरोधात वॉरंट निघाल्याने त्याचे वडील विलास हिरे यांनी मध्यस्थी करून रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले़ यानंतर हिरे यांनी वेळोवेळी धनादेशाद्वारे तीन लाख रुपये दिले; मात्र रोहन हिरे हा शहर सोडून गेल्यानंतर त्याचे वडील विलास हिरे यांनी दिलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावला़ मात्र पतीने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर हिरे यांनी जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत सव्वा लाख रुपये व्याजापोटी देण्यास सांगितले़पती दर महिन्यास व्याजाची रक्कम देत होते़ जाखडी यांची आर्थिक स्थिती कमजोर असल्याने त्यांनी समर्थनगर येथील शोबीज हे दुकान एका पतसंस्थेकडे गहाण ठेवले़ या व्यवहारासाठी विलास हिरे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे त्यांचा मेव्हणा फरहान यांना मध्यस्थी घातले़ या दुकानाचे साठेखत हिरे यांच्या नावावर करून व्याजाचे ३ लाख ७५ हजार रुपये देण्याचे ठरले़ त्यासाठी कांदे, फरहान व हिरे यांच्याकडून जाखडींकडे सातत्याने पैशाची मागणी व धमक्या देणे सुरू झाले़ २९ मार्चला फरहान याने फोनवरून पैशांची मागणी केल्याने जाखडी यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने विकून १ लाख ७५ हजार रुपये जमा करून दिले़ तर उर्वरित २ लाख रुपयांसाठी सुहास कांदे व फरहान यांचा तगादा सुरूच होता़ तसेच पैसे न मिळाल्यास धमकीही दिली जात होती़ त्यामुळे घाबरलेले जाखडी यांनी ३१ मार्चला पत्नीचा डायमंड सेट व मुलीचे ब्रेसलेट घेऊन कांदे यांच्याकडे गहाण ठेवण्यासाठी दिले़ मात्र, कांदे यांनी रोख रकमेची मागणी करून दुकानावर कब्जा करण्याची तसेच अपहरण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली़
अजय जाखडी यांनी पत्री उमा यांना फोन करून घरातून सोन्याचा सेट घेऊन महात्मानगरच्या क्रिकेट ग्राऊंडजवळ बोलावले. पत्नी उमा हिच्याकडून दागिने घेतल्यानंतर ते कांदे यांच्याकडे देतो व मुदतवाढ घेतो़ तोपर्यंत फोन करून नको असे सांगत जाखडी हे स्वत:च्या सफारी स्ट्रॉम (एमएच १५, ५४४९) या चारचाकीतून गेले. पती रात्रभर घरी न आल्याने उमा जाखडी यांनी सकाळी सासरे व भावाला बोलावून ही माहिती दिली. त्यानुसार १ एप्रिल रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रारही केली. मात्र पतीशी संपर्क होत नसल्याने संशयित कांदे, फरहान व विलास हिरे यांनी अपहरण केल्याची फिर्याद सोमवारी (दि़२) पहाटे गंगापूर पोलिसांत दिली़ दरम्यान, या गुन्ह्णाचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे करीत आहेत़ (प्रतिनिधी)