बॅरिकेडिंगचा पोलिसांना विसर
By Admin | Updated: September 29, 2015 22:52 IST2015-09-29T22:47:57+5:302015-09-29T22:52:55+5:30
अपघाताची शक्यता : नागरिकांची तक्रार; रस्त्यावरील बॅरिकेड्सचा अडथळा

बॅरिकेडिंगचा पोलिसांना विसर
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळा, तसेच गणेशोत्सव बंदोबस्त संपल्यानंतरही बंदोबस्तासाठी रस्त्यावर लावलेले लोखंडी बॅरिकेडिंग केवळ बाजूला हटविण्याच्या कामावरच पोलीस प्रशासनाने भर दिला आहे. मुळात बॅरिकेडिंग ‘जैसे थे’ असल्याने पोलीस प्रशासनाला बॅरिकेडिंगचा विसर पडल्याचे बोलले जात आहे. रस्त्यालगत पडलेल्या बॅरिकेडिंगमुळे नागरिकांना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागत आहे.
रस्त्यालगत पडून असलेल्या बॅरिकेडिंगमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात पोलीस प्रशासनाने शाहीमार्ग ते गल्लीबोळात तसेच मुख्य रस्त्यावर जागोजागी शेकडो लोखंडी बॅरिकेडिंग उभारून नागरिकांना तटबंदी केली होती. या बॅरिकेडिंगमुळे स्थानिक नागरिकांसह भाविकांची चांगलीच अडचण झाली होती. सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसरी शेवटची पर्वणी संपून तब्बल दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे, मात्र अजूनही बॅरिकेडिंगचा विळखा कायम आहे. रस्त्यावर उभे केलेले बॅरिकेडिंग काही हटविले, तर काही अजून रस्त्यातच ‘जैसे थे’ असल्याने बॅरिकेडिंगची तटबंदी कायम असल्याचा भास नागरिकांना होत आहे. रामकुंडाकडे येणाऱ्या रस्त्यावरदेखील काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स पडूनच असून, हे बॅरिकेडिंग कधी हटणार, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)